बलिप्रतिपदेला बळिराजाचे  "लेटर टू पीएम' आंदोलन! 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 13 November 2020

किसान सभेच्या राज्य कौन्सिलच्या बैठकीत याबाबत नियोजन करण्यात आले. राज्यातील 23 जिल्ह्यांत शेतकऱ्यांकडून पत्र लिहून घेण्याची मोहीम किसान सभेने सुरू केली आहे.

अकोले : केंद्र सरकारच्या कृषी धोरणांमुळे देशातील शेतकरी प्रचंड अडचणीत आले आहेत. केंद्राने शेतकरीविरोधी धोरणात बदल करावा, या मागणीसाठी बलिप्रतिपदेच्या दिवशी (ता. 16) राज्यातील हजारो शेतकरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रे पाठविणार आहेत. 

किसान सभेच्या राज्य कौन्सिलच्या बैठकीत याबाबत नियोजन करण्यात आले. राज्यातील 23 जिल्ह्यांत शेतकऱ्यांकडून पत्र लिहून घेण्याची मोहीम किसान सभेने सुरू केली आहे. तालुकास्तरावर 16 नोव्हेंबर रोजी मिरवणुका काढून हजारो पत्रे टपालपेटीत टाकली जाणार आहेत. 

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी मदतीत भरीव वाढ करावी, पीकविमा योजनेची योग्य अंमलबजावणी करावी, शेतकऱ्यांच्या सर्व पिकांना आधार भावाचे कायदेशीर संरक्षण द्यावे, किमान आधार भावाने शेतमालाच्या खरेदीसाठी आर्थिक तरतूद करून व्यवस्था उभारावी, शेतकऱ्यांच्या देशव्यापी कर्जमुक्तीसाठी केंद्रीय स्तरावर योजना राबवावी.

शेतकरीविरोधी सर्व कायदे रद्द करावेत, शेतकऱ्यांना व्यापार व तंत्रज्ञानस्वातंत्र्य द्यावे, कसत असलेल्या जमिनी शेतकऱ्यांच्या नावे कराव्यात आदी मागण्यांचा आग्रह या पत्रांद्वारे शेतकरी पंतप्रधान मोदी यांच्याकडे करणार आहेत. किसान सभेतर्फे डॉ. अशोक ढवळे, जे. पी. गावित, किसन गुजर, अर्जुन आडे, उमेश देशमुख व डॉ. अजित नवले आदी या मोहिमेसाठी परिश्रम घेत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Baliraja's "Letter to PM" movement to Balipratipade!