बापूसाहेब राहुरी पोलिसांवर चिडले, काम सुधारले नाही तर...

विलास कुलकर्णी
Friday, 7 August 2020

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे वडील माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी पोलिस निरीक्षक देशमुख यांच्या कार्यपद्धतीवर थेट हल्लाबोल केल्याने राजकीय विश्‍लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

राहुरी : ""तालुक्‍यात कायदा- सुव्यवस्था बिघडली आहे. गावोगावी जुगार, मटका, हातभट्टीची दारूविक्री उघडपणे सुरू आहे. दरोडे, घरफोड्या वाढल्या आहेत. रोज दुचाकीचोरी होत आहे. गुन्ह्यांची संख्या वाढली; परंतु गुन्हे नोंदविले जात नाहीत.

गुन्ह्यांची उकल, गुन्हेगारांवर कारवाया, गुन्ह्यांचे तपास थंडावले आहेत. कोरोना संकटाच्या काळात सामान्य जनतेवर गुन्हे दाखल करण्यापुरते पोलिस खात्याचे अस्तित्व राहिले आहे.

आठ दिवसांत अवैध धंदे व दुचाकीचोऱ्या बंद झाल्या नाहीत, तर, पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख हटाव मोहीम राबविली जाईल,'' असा इशारा माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी आज दिला. 

पत्रकारांशी बोलताना तनपुरे म्हणाले, ""कोरोना संकटाच्या काळात अवैध धंद्यांना मोकळे रान मिळाले आहे. सामान्य जनता घरात लॉकडाउन; तर गुन्हेगारांचा सुळसुळाट वाढला आहे. अल्पवयीन चौदा-पंधरा वर्षांच्या मुलांच्या हातात गावठी पिस्तुले आली आहेत. प्रत्येक गावात दारूअड्ड्यांची संख्या दुप्पट-तिप्पट वाढली आहे.

हेही वाचा - शारीरिक शिक्षण आता दिशा अॅपवर

गौण खनिजाच्या चोरट्या वाहतुकीची भरधाव वाहने सामान्य जनतेला चिरडीत आहेत. नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने देवळाली प्रवरा येथे मोठा जुगारअड्डा उद्‌ध्वस्त करून, पोलिस निरीक्षक देशमुख यांची अकार्यक्षमता समोर आणली आहे.'' 

""दुचाकींच्या चोऱ्या रोज होत आहेत. दुचाकीमालक पोलिस ठाण्यात गेल्यावर, "चार दिवस वाट पाहा; दुचाकी सापडेल,' असा सल्ला देऊन, गुन्हा नोंदविण्यापासून परावृत्त केले जाते. गुन्हे नोंदविले जात नाहीत. त्यामुळे गुन्ह्यांची संख्या कमी दिसते. दुचाकीमालकाचा मोबाईल क्रमांक चोरांना मिळतो. दहा-पाच हजारांची तडजोड झाल्यावर दुचाकी सापडते.

पोलिसांना दुचाकी सोडविण्यासाठी चोरट्यांचे हात ओले करावे लागतात, यासारखी नामुष्की नाही. अशा दुचाकीचोरांच्या टोळ्यांनी उच्छाद मांडला आहे. ज्यांनी गुन्हे नोंदविले, त्यांना दुचाकी कधीच सापडत नाही. अशा दुचाकींचे सांगाडे मुळा धरणाच्या जलफुगवट्यात सापडतात. गुंतागुंतीचे गुन्हे पोलिस उघडकीस आणतात; पण राहुरीत दुचाकीचोर सापडत नाहीत,'' अशी खंत तनपुरे यांनी व्यक्त केली. 

ते म्हणाले, ""वर्षभरापूर्वी गुहा येथे पडलेल्या दरोड्याचा मुख्य सूत्रधार सापडला. त्याला न्यायालयाने अकरा दिवस पोलिस कोठडी दिली; मात्र पोलिसांना मुद्देमाल हस्तगत करता आला नाही. महाडुक सेंटर येथे आठ ठिकाणी, तर ब्राह्मणी येथे सात ठिकाणी घरफोड्या झाल्या. चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसले; परंतु पोलिसांना दिसत नाहीत. कोरोना संकटाच्या काळात सामान्य जनतेवर गुन्हे दाखल करण्याचा सपाटा लावला; मात्र खरे गुन्हेगार मोकाट फिरत आहेत.'' 

पोलिस खात्याचा गुन्हेगारांवर वचक राहिला नाही. निष्क्रिय कारभारामुळे पोलिसगिरी सामान्य जनतेपुरती मर्यादित झाली आहे. त्यामुळे जनतेचा रोष वाढला आहे. गावोगावी फोफावलेले अवैध धंदे येत्या आठ दिवसांत बंद करून, दुचाकीचोरांच्या टोळ्यांचा बंदोबस्त केला नाही, तर पोलिस निरीक्षक देशमुख हटाव मोहीम राबविली जाईल. त्याद्वारे जनतेचा आक्रोश प्रशासनासमोर मांडला जाईल. त्यांचे नेतृत्व मी स्वतः करीन, असा इशारा तनपुरे यांनी दिला. 

राज्यमंत्र्यांच्या वडिलांवरच ही वेळ यावी... 
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे वडील माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी पोलिस निरीक्षक देशमुख यांच्या कार्यपद्धतीवर थेट हल्लाबोल केल्याने राजकीय विश्‍लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत. गृह खाते "राष्ट्रवादी'कडे असताना, मंत्र्यांच्या वडिलांना पोलिस निरीक्षक हटाव मोहीम राबविण्याचा इशारा द्यावा लागतो, यावरून तालुक्‍यातील कायदा- सुव्यवस्थेची अधोगती ठळकपणे अधोरेखित होत असल्याचे मानले जात आहे. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bapusaheb Tanpure Rahuri got angry with the police