तुम्हाला वाटेल हा रस्ताय, पण हे आहे राशीनचे फुकटची 'पावडर' सेंटर

दत्ता उकिरडे
Tuesday, 9 February 2021

राशीनमधून गेलेल्या बारामती-अमरापूर राज्यमार्गाचे सुमारे 252 कोटींचे काम गेल्या दीड वर्षापासून अत्यंत संथगतीने सुरू आहे.

राशीन (अहमदनगर) : येथून जाणाऱ्या बारामती-अमरापूर या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. अनेक महिन्यांपासून रस्ता खोदून ठेवल्याने व ते काम थांबल्याने धुळीमुळे प्रवाशांना फुकटची 'पावडर' लावायला मिळत आहे. खडी व वाळू दर्जाहीन असल्याने, हे काम थांबविण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

राशीनमधून गेलेल्या बारामती-अमरापूर राज्यमार्गाचे सुमारे 252 कोटींचे काम गेल्या दीड वर्षापासून अत्यंत संथगतीने सुरू आहे. त्यामुळे विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. खोदून ठेवलेल्या रस्त्यावर उठणाऱ्या धुळीच्या लोटात, रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या व्यावसायिकांना आणि ग्रामस्थांना रोज माखून निघावे लागते. या कामाला कोणी वाली आहे की नाही, असा सवाल ग्रामस्थांमधून विचारला जात आहे. 

बाजारपेठेतून जाणारा हा रस्ता पूर्णपणे खोदून ठेवला आहे. तसेच, त्याच्या बाजूने सुरू असलेले गटाराचे कामही काही ठिकाणी अपूर्ण आहे. उखडलेल्या रस्त्यावर खडी टाकलेली आहे. काही ठिकाणी रस्ता ओबड-धोबड उखडून ठेवलेला आहे. त्यामुळे या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना मोठी कसरत करावी लागते. या रखडत चाललेल्या कामांबाबत लोकप्रतिनिधी का बोलत नाहीत, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. दरम्यान, अभियंत्यांनी दिलेल्या आश्‍वासनामुळे रस्त्याचे काम लवकरच सुरू होईल, अशी आशा ग्रामस्थांना आहे. 

बारामती-अमरापूर रस्त्याची दुरवस्था झाली आहे. राशीनमधून जाणाऱ्या या रस्त्याचे काम खडी व वाळूचा दर्जा चांगला नसल्याने थांबविण्यात आले असून, संबंधित ठेकेदाराला सूचना दिल्या आहेत. त्यात सुधारणा होऊन लवकरच काम सुरू होईल. 
- अमित निमकर, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Baramati Amarpur road is badly damaged