
अहमदनगर ः छत्रपती शहाजी राजेंच्या शौर्याच्या कथा इतिहासकारांनी, बखरकारांनी लिहिल्या आहेत. त्यावर अभ्यासही केला जातो आहे. अहमदनगरचा निजामशहा, विजापूरचा आदिलशहा यांच्याकडे सरदारकी करतानाच त्यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले. गमिनी कावा करण्यात शहाजीराजे पटाईत होते. त्यांचे बंधू शरीफराजे यांचा अतुलनीय पराक्रम इतिहासकारांनी नोंदवून ठेवला आहे.
भातवडीचा रणसंग्राम आणि निजामशाहीतील राजेंचे वास्तव्य त्यांच्या व छत्रपती शिवाजीराजांच्या आयुष्याला कलाटणी देणारी घटना आहे.
भातवडी हे ठिकाण नगर तालुक्यात आहे. त्या रणसंग्रामात मिळवलेला विजय हा निजामशाहीतील शेवटचा विजय आहे. सन 1490 ला स्थापन झालेले निजामशाहीचे राजधानीचे शहर अहमदनगर होते. अहमदशाह निजामशाह याच्याच नावावरुन ते नाव पडले. जवळपास अकराहून अधिक सुलतान अहमदनगरच्या गादीवर आले. सन 1600मध्ये चाँदबिबी आणि अकबर बादशहाच्या युद्धात निजामशाहीचा पराभव झाला. नगरची निजामशाही संपुष्टात आली. त्याच वेळी मलिकंबरच्या नेतृत्वाखाली मराठे शूर सरदार मंडळी एकत्र आली. आणि मोगल आणि आदिलशाहीचा प्रतिकार करू लागली. याच शहरात हिंदवी स्वराज्याची बीजं रोवली गेली.
निजामशाही बुडवायची असे मोगलांचे धोरण होते. आणि मराठ्यांना ही निजामशाही वाचवायची होती. कारण त्या काळची ती अपरिहार्यता होती. छत्रपती शहाजीराजे यात सर्वात पुढे होते. त्यांना इथेच पराक्रम गाजवता आला.
आदिलशाह बादशाह मोगलांना मदत करतोय हे पाहून मलिकंबर बिदरमार्गे विजापूरवर चालून गेला. इब्राहिम अदिलशाहस कोंडीत पकडले. इकडे आदिलशाहचा सरलष्कर मुल्ला मोहम्मद हा तळ देऊन नगरपासून पाच कोसावर भातोडी या गावी बसला. मुल्ला मोहम्मद मोगलांची फौज आपल्या मदतीला येणार हे पाहून गाफील राहिला. याच संधीचा फायदा घेण्याचे राजे शहाजीराजे आणि बंधू राजे शरीफजी यांनी ठरवले. मुल्ला मोहम्मद गाफील असतांना त्याच्यावर अचानक हल्ला केला. त्यात मुल्ला मारला गेला. विजापूरचे अनेक सरदार जेरबंद केले. प्रचंड सैन्य दारुगोळा मराठ्यांच्या हाती लागला.
यात राजे शरीफजी यांनी एक कमान सांभाळली होती. त्यांचा सामना मनचेहर नावाच्या आदिलशाहच्या सरदारासोबत होता. मनचहर हा हत्तीवर स्वार होऊन आला. राजे शरीफजी यांनी प्रचंड शौर्य गाजवले. बाणांचा वर्षाव होऊन राजे शरीफजी यांना भातवडीच्या लढाईत वीर मरण आले. त्यांची समाधी भातवडी येथे आहे. राजे शहाजींनी एक मोर्चा सांभाळून मनचहरला कैद केले. मलिक अंबरसमोर बंदिवान म्हणून त्याला हजर केले.
मोगली फौजेचे नेतृत्व लखोजीराजे करीत होते. त्यांना भातवडीच्या लढाईत आदिलशाही फौजेस अपयश आल्याचे वृत्त समजताच त्यांनी भातवडीस न येता मोगली सैन्य मागे फिरवले. हा निजामशाहीला मराठ्यांमुळे प्रचंड मोठा विजय मिळाला होता. त्याचे नेतृत्व शहाजीराजे करीत होते. याच लढाईत त्यांनी गनिमी कावा करीत तलाव फोडून मोगलांचे सैन्य वाहून लावले होते. कमी फौज असतानाही मिळवलेले शौर्य अतुलनीय होते. याच लढाईने शहाजीराजेंचा दबदबा वाढवला.
यापुढे शहाजी राजेंचे कर्तृत्व सर्व शाह्यांपर्यंत पोहोचले. हा निजामशाहचा शेवटचा विजय ठरला. सन. 1626 मध्ये मलिक अंबरचा मृत्यू झाला. सन 1636 पर्यंत निजामशाहच्या शेवटच्या वारसास गादीवर बसवून राजे शहाजींनी निजामशाहीचा कारभार पाहिला. शेवटी निजामशाहीत कागाळ्या सुरू झाल्याने मानाने ते आदिलशाहीत सरलष्कर या मोठया हुद्द्यावर गेले.
शाह शरीफ दर्ग्याच्या नवसाची कथा
अहमदनगर शहरात शाह शरीफ हे सुफी संत होऊन गेले. त्या काळात विठोजी व मालोजीराजे भोसले अहमदनगरला वास्तव्यास होते. मालोजीराजेंनी शाह शरीफ दर्ग्याला नवस केल्याची कथा आहे. तेव्हापासून छत्रपतींचे घराणे या दर्ग्याचे भक्त आहे. काही इतिहासकार सांगतात, शाह नावावरूनच शहाजी व शरीफजी नावे ठेवल्याचे सांगितले जाते. नगर शहरातील रस्त्याला आजही शहाजी रोड म्हणून ओळखले जाते. अर्बन बँक परिसरात त्यांचा वाडा आहे. त्याला शहाजी मोहल्ला म्हणून ओळख होती. नगरमधील ऐतिहासिक वस्तू संग्रहालयात छत्रपती शहाजीराजे आणि माँ जिजाऊंचा पुतळा आहे. दोघांचा एकत्र असलेला हा एकमेव पुतळा असल्याचे शिवप्रेमी सांगतात.
संपादन - अशोक निंबाळकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.