esakal | अनुदानावरून भाजप-राष्ट्रवादी-शिवसेनेत श्रेयाची लढाई
sakal

बोलून बातमी शोधा

money

पालकमंत्र्यांच्या दौऱ्यात आम्हीही सहभागी झालो होतो, असे चितळे यांनी म्हटले आहे.

अनुदानावरून भाजप-राष्ट्रवादी-शिवसेनेत श्रेयाची लढाई

sakal_logo
By
राजेंद्र सावंत

पाथर्डी : अतिवृष्टीने झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी मिळणाऱ्या 14 कोटींचे अनुदानाचे श्रेय घेण्यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप व शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे. भाजपच्या एका गटाच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांना पाहणी दौऱ्यात अडविले. आता अनुदानाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये, अशी टीका ऍड. प्रताप ढाकणे यांनी केली. 

शिवसेनेचे तालुकाप्रमुख अंकुश चितळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सहकार्याने हे अनुदान मिळाल्याची माहिती दिली. तालुक्‍यातील शेतकऱ्यांना 14 कोटींच्या अनुदानाची रक्कम मिळाली आहे. तिचे वाटप मंगळवारपासून (ता.17) सुरू होणार आहे. ऍड. ढाकणे, माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना नुकसानीची पाहणी करण्याची विनंती केली होती. त्यानुसार, मुश्रीफ यांनी शेवगाव-पाथर्डीचा दौरा केला. त्यावेळीच मुश्रीफ यांनी शेतकऱ्यांची दिवाळी गोड करू, अशी ग्वाही दिली होती. 

सरकारने पिकांसाठी हेक्‍टरी 10 हजार रुपये, तर फळपिकांसाठी 25 हजार रुपयांची मदत जाहीर केली. ही मदत आली आहे. ऍड. ढाकणे, घुले यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, की ही मदत महाविकास आघाडी सरकार करणार आहे. त्याचे श्रेय भाजपने लाटू नये. शिवसेनेचे तालुकाप्रमुख चितळे यांनी शेतकऱ्यांना मिळणारी मदत ठाकरे सरकारने केल्याचे पत्रकात म्हटले आहे. महाआघाडीचे आम्हीही घटक आहोत.

पालकमंत्र्यांच्या दौऱ्यात आम्हीही सहभागी झालो होतो, असे चितळे यांनी म्हटले आहे. पालकमंत्र्यांच्या दौऱ्याआधी एक दिवस अगोदर भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांनी शेवगाव-पाथर्डीचा दौरा करून पिकांच्या नुकसानीची पाहणी केली होती. त्यामुळे आता शेतकऱ्यांना मिळणारे अनुदान कोणामुळे मिळाले, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

राजळे यांनीही पालकमंत्र्यांना लेखी पत्र देऊन पिकांची नुकसानभरपाई देण्याची मागणी केली होती. शिवसेना, राष्ट्रवादी व भाजपच्या कलगीतुऱ्यात कॉंग्रेस शांत असल्याचे दिसते. श्रेय कोणालाही मिळो, शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम लवकर जमा करावी, अशी मागणी होत आहे.