कोरोनामुळे 'काळजी घ्या' हा शब्द झाला नित्याचाच आणि परवलीचा

मार्तंड बुचुडे
Saturday, 3 October 2020

फोनवर कामाबाबतच्या तसेच व्यावसायिक चर्चा संपल्या नंतर शेवटी आपल्या भागात कोरोनाची काय स्थिती आहे, या विषयी चौकशी करतात. आणि शेवटी काळजी घ्या हा परवलीचा शब्द एकमेकांना वापरताना दिसत आहे.

पारनेर (नगर) : कोरोनाच्या महामारीमुळे राज्यात गेली काही दिवस लॉकडाऊन होते. आता लॉकडाऊन शिथील झाले असले तरीही लोकांच्या फिरण्यावर व गाठी भेटीवर बंधणे आली आहेत. परिणामी अनेकजण एकमेकांशी मित्र व नातेवाईकांसह व्यावसायिक कारणांसाठी फोनवरूनच संपर्क करत आहेत. मात्र फोनवर कामाबाबतच्या तसेच व्यावसायिक चर्चा संपल्या नंतर शेवटी आपल्या भागात कोरोनाची काय स्थिती आहे, या विषयी चौकशी करतात. आणि शेवटी काळजी घ्या हा परवलीचा शब्द एकमेकांना वापरताना दिसत आहे. पुर्वी हा शब्द सहसा कधी ऐकण्यासही मिळत नव्हता, मात्र आता तो नित्याचाच आणि परवलीचा झाला आहे.

जागतिक पातळीवर तसेच देशात आणि राज्यातही कोरोनाने हाहाकार माजवला आहे. काही केल्या कोरोनावर निय़ंत्रण आणता आले नाही. तसेच हा आजार किती दिवस असेल हे ही कोणी सांगू शकत नाही. त्यामुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी लोकांच्या फिरण्यावर व एकमेकांच्या गाठी भेटी घेण्यावर मोठ्या प्रमाणात बंधणे आली आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात आणि राज्यातही गेली अनेक दिवस लॉकडाऊन होते. त्यानंतर ते शिथील करण्यात आले आहे. मात्र अद्यापही जनजीवन सुरळीत झाले नाही. लोकांच्या फिरण्यावर तसेच गाठी भेटीवर बंधणे येत आहेत. त्यामुळे मित्र मैत्रीण तसेच नातेवाईकांशी बहुतेकजण फोनवरूनच संपर्क साधत आहेत. फोनवरून संपर्क साधल्यानंतर सुरवातीला एकमेकांच्या ख्याली खुशालीची चौकशी होते. त्यानंतर प्रत्येकजण आपल्या भागात कोरोनाची काय स्थिती आहे, याची आर्वजून चौकशी करताना दिसत आहेत. त्यानंतर शेवटी एकमेकांना काळजी घ्या, असा सल्ला दिल्याशिवाय फोन बंद करताना दिसत नाहीत.
 
तसेच व्यावसायिकांच्या बाबतीतही घडत आहे. व्यावसायिकही आपल्या कामाबाबत तसेच मालखरेदीची बहुतेक कामे फोनवरूनच करत आहेत. या सर्वांचीच प्रथम व्यावसायिक व खरेदीची चर्चा होते. नंतर कोरोनाची चर्चा होते व शेवटी काळजी घ्या, असा एकमेकांना सल्ला दिल्या शिवाय त्यांचाही फोन बंद होत नाही. 
    
या पुर्वी शुभेच्या शुभ सकाळ, शुभ संध्याकाळ, शुभ दिवस असे शब्द वापरून फोन बंद होत असे. आता मात्र या शब्दांची जागा काळजी घ्या या परवलीच्या शब्दाने घेतली आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Because of the corona virus people are saying be careful when talking to each other