esakal | कोरोनाबाणी...शाळांमध्ये मुलांशिवाय साजरा होणार स्वातंत्र्य दिन
sakal

बोलून बातमी शोधा

Independence Day

दरवर्षी शाळा कॉलेजमध्ये 15 ऑगस्ट स्वातंत्र दिन व 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन या दोन अतिशय महत्वाच्या राष्ट्रीय सणांबरोबरच इतरही राष्ट्रीय सण मोठ्या धुमधडाक्यात साजरे केले जातात. मात्र कोरोनाच्या माहामारीमुळे यंदा शाळा कॉलेजेस अद्यापही सुरू झालेली नाहीत. त्यामुळे आता स्वातंत्र दिनी ख-या अर्थाने शिक्षकांना व ग्रामस्थांनाही मुलांची आठवण होणार आहे.

कोरोनाबाणी...शाळांमध्ये मुलांशिवाय साजरा होणार स्वातंत्र्य दिन

sakal_logo
By
मार्तंड बुचुडे

पारनेर (नगर) : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील सर्वच शाळा व कॉलेजेस बंद आहेत. स्वातंत्र्यानंतर कदाचित प्रथमच शाळा कॉलेजमधील 15 ऑगस्ट स्वातंत्र दिनाचे ध्वजारोहण मुलांशिवाय होणार आहे. ही बाब शाळेच्या शिक्षकांसह मुलांनाही मोठी क्लेशदायक ठरणार आहे. कदाचित भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अशी घटना प्रथमच राज्यात घडणार असेल.

दरवर्षी शाळा कॉलेजमध्ये 15 ऑगस्ट स्वातंत्र दिन व 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन या दोन अतिशय महत्वाच्या राष्ट्रीय सणांबरोबरच इतरही राष्ट्रीय सण मोठ्या धुमधडाक्यात साजरे केले जातात. मात्र कोरोनाच्या माहामारीमुळे यंदा शाळा कॉलेजेस अद्यापही सुरू झालेली नाहीत. त्यामुळे आता स्वातंत्र दिनी ख-या अर्थाने शिक्षकांना व ग्रामस्थांनाही मुलांची आठवण होणार आहे.

स्वातंत्र्य दिन तसेच प्रजासत्ताक दिनी मुले गावातून स्वच्छ गणवेशात प्रभात फेरी काढतात. हातात तिरंगा फडकवत मोठ्या दिमाखात राष्ट्रीय पुरूषांच्या व भारतमाता की जय यासारख्या देशाच्या समर्थनार्थ घोषणा देत गावाचा परिसर दुमदुमून काढतात. मात्र यंदा या घोषणाही ऐकावयास मिळणार नाहीत. ना मुलांची प्रभात फेरीही दिसणार नाही. त्यामुळे मुलांशिवाय हा पहिलाच स्वातंत्र्यदिन आता शाळा व ग्रामस्थांना करावा लागणार आहे.

अनेक मुलांच्या व शिक्षकांच्याही जीवनात प्रथमच अशी स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे छोट्या मुलांचाही आनंद हिरावून घेतला जाणार आहे. स्वातंत्र्यदिन किंवा प्रजासत्त्ताक दिन पुढे चार किंवा आठ दिवस आहे. तोच शालेय मुले व शिक्षकही त्या सणाच्या तयारीला लागतात. कपडे धुण्यापासून ते थेट त्या कपड्यांना इस्त्री करण्यापर्यंत मुलांची धावपळ सुरू असते.

शाळा कॉलेजमधील मैदानाची साफसफाई आदी गोष्टी सुरू होतात. तसेच अनेक पालक मुलांना नवीन कपडे तसेच बुट किंवा चप्पल घेणे आदी गोष्टी याच पार्श्वभूमीवर खरेदी करतात. मुलेही त्यामुळे आनंदीत होतात. दुकानात जाऊन तिरंगा खरेदी करणे किंवा छातीवरील छोटा झेंडा खरेदी करणे यात छोट्यांची मोठी मौजमजा असते. हा आनंद यंदा या छोट्यांना घेता येणार नाही. 

घरात बसूनच यंदा छोट्या बालबच्यांना स्वातंत्र्यदिन साजरा करावा लागणार... 

यंदा मुलांना स्वातंत्र्य दिनाची तावातावाने शाळेच्या व्यासपीठावर भाषणे करता येणार नाहीत. तसेच गावातून प्रभात फेरी मारताना मोठ्याने ओरडून घोषणाबाजी करता येणार नाही. त्यामुळे घरात बसूनच यंदा छोट्या बालबच्यांना स्वातंत्र्यदिन साजरा करावा लागणार आहे. त्यामुळे लहान मुलांमध्ये मोठी नाराजी दिसून येत आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले