श्रावणबाळ, वृद्धापकाळ, संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी वंचित

मार्तंड बुचुडे
Saturday, 5 September 2020

संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ, वृद्धापकाळ, विधवा, अपंग व परित्याक्त्या आदी योजनांमार्फत सरकारी पातळीवर गोरगरीब व गरजूंना एक हजाराचे दरमहा वेतन दिले जाते.

पारनेर (अहमदनगर) : संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ, वृद्धापकाळ, विधवा, अपंग व परित्याक्त्या आदी योजनांमार्फत सरकारी पातळीवर गोरगरीब व गरजूंना एक हजाराचे दरमहा वेतन दिले जाते. मात्र या विविध योजनांचे अनुदान सरकारी पातळीवरून दोन महिन्यापासून न आल्याने तालुक्यातील या सर्व या योजनामार्फत सुमारे 34 हजाराहून अधिक गरजू लाभार्थी वंचीत आहेत.

त्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. हे लाभार्थी मात्र दररोज बँकेत खेटा घालत आहेत. तालुक्यात वरील विविध योजनेमध्ये सुमारे 34 हजाराहून अधिक लाभार्थी आहेत.

जिल्ह्यात सर्वाधिक लाभार्थी पारनेर तालुक्यात आहेत. या योजनाखाली गरजूंना प्रत्येकी प्रती महिना एक हजार रूपये त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. मध्यंतरी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर एकदम चार महिन्याचे अनुदान संबधीत लाभार्थींच्या खात्यावर जमा केले होते. मात्र आता दोन महिन्यापासून सरकारी पातळीवरून अनुदानच न आल्याने लाभार्थी, वयोवृद्ध व गरजू मात्र दररोज बँकेत हेलपाटे मारत आहेत. त्यामुळे अनेक गोरगरीबांवर उपासमारीची वेळ आली आहे.

राज्यात कोरोना च्या संकटामुळे अनेक उद्योग व्यवसाय तसेच नोकऱ्याही अडचणीत आल्या आहेत. अनेक विकास योजनांची कामे थंडावली आहेत. त्यातच आता संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ, विधवा, अपंग परित्यक्ता या योजनेमार्फत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना गेली अनेक वर्षापासून एक हजार रूपये प्रत्येक महिन्याकाठी मिळत असतात व तेही थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा होतात. 

सध्या या योजनांचे जुलै व ऑगस्ट या दोन महिन्याचे अनुदान अद्याप सराकरी पतळीवरूनच आले नसल्याने हे लाभार्थी या अनुदानापासून वंचित आहेत. याबाबत तहसील कार्यालयातून पाठपुरावा करण्यात येत आहे. अनुदान प्राप्त होताच संबधीतांच्या खात्यावर ते अनुदान तात्काळ जमा करण्यात येईल, अशी माहीती संबधीत विभाग प्रमुखांनी दिली.

ज्या लाभार्थींना अनुदान मिळत आहे. त्यांनी आपले आधारकार्ड आपले अनुदान ज्या बँकेत जमा होत आहे. त्या बँक खात्यास लिंक करून घ्यावे. अनेक वेळ सरकारी पातळीवरून आधार लिंक करण्यासाठी मुदत वाढ देण्यात आली आहे. आता 30 सप्टेंबर अखेरजे लाभार्थी आपले आधार कार्ड लिंक करणार नाहीत. त्यांचे अनुदान बंद होणार आहे. तरी सर्व लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड लिंक करावे.
- ज्योती देवरे, तहसीलदार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beneficiaries of Sanjay Gandhi Niradhar Yojana in Parner taluka did not get the benefit