शेवगावात आयपीएल सामन्यांवर लागतो लाखोंचा सट्टा, पोलिसांची डोळेझाक

सचिन सातपुते
Thursday, 29 October 2020

गेल्या महिनाभरापासून आय.पी.एल क्रिकट सामने सुरु असून त्यातील प्रत्येक सामन्यातील षटके, त्यात टाकले जाणारे चेंडू, विजय - पराजय, धावा, फलंदाजी, गोलंदाजी, खेळाडू, बळी आदींवर मोठया प्रमाणावर सट्टा लावण्यात येतो.

शेवगाव : सध्या सुरु असलेल्या आय.पी.एल क्रिकेट सामन्यांवर सट्टेबाजीच्या माध्यमातून मोठया प्रमाणावर पैसे जमा करण्याचे प्रकार शेवगाव शहरात सुरु आहेत. त्यामुळे अनेक तरुण कर्जबाजारी झाले आहेत. सट्टेबाजीवर लाखो रुपयांची उलाढाल दररोज होते. 

या अवैध धंदयाकडे मात्र अजूनही कारवाई झालेली नाही. पोलीसही याबाबत कारवाईचे नाटक रचून त्यातून मोठया प्रमाणावर आर्थिक तडजोड करत असल्याने अनेक तरुणांचे आयुष्य उध्वस्त होत आहे.

गेल्या महिनाभरापासून आय.पी.एल क्रिकट सामने सुरु असून त्यातील प्रत्येक सामन्यातील षटके, त्यात टाकले जाणारे चेंडू, विजय - पराजय, धावा, फलंदाजी, गोलंदाजी, खेळाडू, बळी आदींवर मोठया प्रमाणावर सट्टा लावण्यात येतो. शेवगाव तालुक्यात असा व्यवसाय करणारे ठराविक सट्टेबाज असून सामन्याच्या आधी, सामना सुरु असतांना, दुस-या डावाआधी ठराविक रक्कमेचा भाव जाहीर केला जातो. त्याचे विशिष्ट कोड वर्ड असतात. त्यामुळे त्याची खबर काही मिनीटातच संबंधीत पैसे लावणा-या व्यक्तीपर्यंत पोहच होते.

या व्यवहारात ठराविक जागा, ठराविक व्यक्ती ठरलेल्या असल्याने त्यातही बराचसा व्यवहार मोबाईल फोनव्दारे पार पाडल्या जातो. त्यामुळे अनेक जणांना याचा थांग पत्ता लागत नसला तरी लाखो रुपयांची उलाढाल नियमीत सुरु असते. शहरातील अनेक मटका व्यावसायीक यात उतरल्याने त्याचे लोण तालुक्यातही पसरले आहे. 

अवघ्या काही क्षणात हजारो रुपये मिळत असल्याने अनेक तरुण या सट्टेबाजीकडे दलाल मित्राच्या माध्यमातून ओढले जातात. त्याचा परिणाम त्यांच्या मानसिकतेवर झाला. अनेक जण कर्जबाजारी व व्यसनाधीन झाले आहेत. त्यातून कौटुंबिक वादविवाद वाढत आहेत. याच वादातून तीन ते चार वर्षापूर्वी शहरात एका तरुणाचा खुनही झाला होता. मात्र, तरीही दिवसेंदिवस हा व्यवसाय अधिक जोमाने सुरु आहे. तडजोडीतून पैसा मिळवण्याचे एक हमखास माध्यम म्हणून पोलीस याकडे पाहत असल्यामुळे तरुण वर्ग मात्र कर्जबाजारी व व्यसनाधीन होत आहे.

तडजोड करून सोडले
गेल्या आठवडयात तालुक्यातील ढोरजळगाव येथील फार्म हाऊस चार जणांना व वरुर येथील घरातून एकाला ताब्यात घेवून पोलीसांनी तब्बल दोन लाख रुपयांना तडजोडीस भाग पाडले. शहरात सट्टेबाजीत सापडलेल्या दहा ते पंधरा जणांकडून तडजोड करुन कुठलीही कारवाई शिवाय सोडून देण्यात आले. सट्टेबाजीत अनेक उच्चभ्रू कुटूंबातील व्यक्ती व मुले गुंतलेले असल्याने पोलीस कारवाईच्या भितीने ते मोठया आर्थिक तडजोडीस तयार होतात. त्यामुळे पोलिसांना आयतेच भांडवल या आय.पी.एलच्या सट्टेबाजीतून उपलब्ध झाले आहे. याबाबत वरीष्ठ अधिका-यांनी लक्ष घालून तरुणांचे उध्दवस्त होणारे आयुष्य वाचवण्याची गरज आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Betting on IPL matches is underway at Shevgaon