अकोल्यातील भाजपचा बडा नेता काँग्रेसच्या गळाला, राष्ट्रवादीलाही गळती

शांताराम काळे
Thursday, 19 November 2020

त्यांचा ओढा हातपंजाकडे आहे. ते काँग्रेस पक्षात लवकरच प्रवेश करणार आहेत. या बाबत  संपर्क साधला असता त्यांनी तसे संकेत दिले. 

अकोले : देशात काँग्रेसची पीछेहाट सुरू आहे. मात्र, प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे नेतृत्व मान्य करीत पक्षात इन्कमिंग सुरू आहे. भाजपचा बडा नेता काँग्रेसच्या गळाला लागला आहे. राष्ट्रवादीतील नेताही थोरातांच्या संपर्कात आहे.

तालुक्याचे राजकीय चित्र हळूहळू बदलत चालले आहे. राष्ट्रवादीतून भाजपात आलेले ज्येष्ठ नेते मधुकरभाऊ नवले , राष्ट्रवादीचे मीनानाथ पांडे हे लवकरच आपापल्या पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत.

त्यांचा ओढा हातपंजाकडे आहे. ते काँग्रेस पक्षात लवकरच प्रवेश करणार आहेत. या बाबत  संपर्क साधला असता त्यांनी तसे संकेत दिले. त्यामुळे अकोले नगरपंचायत व अगस्ती कारखाना निवडणुकीपूर्वीच हा प्रवेश होत असल्याने या प्रवेशाला महत्व प्राप्त झाले आहे.

मधुकर उर्फ भाऊ नवले यांनी 1978 साली लाल निशाण व लाल ध्वज खांद्यावर, लाल सलाम करीत भारतीय कम्युनिष्ट पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले. तालुका सेक्रटरी, जिल्हा सेक्रटरी सदस्य महाराष्ट्र राज्य कौन्सिल, भारतीय कम्युनिष्ट पक्ष, तालुका व जिल्हा अध्यक्ष किसान सभा, सदस्य महाराष्ट्र राज्य किसान सभा, त्यानंतर काँग्रेस पक्षात प्रवेश, अहमदनगर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष शेतकरी शेतमजूर संघटना, जिल्हा परिषद सदस्य तर दोन वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काम केले.

ते अमृतगर दूध संघाचे संचालक, संगमनेर भाग सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष, विद्यमान अध्यक्ष अभिनव शिक्षण संस्था , बुवासाहेब नवले सहकारी संस्था, त्यांनी भंडारदरा पाणी फेरवाटप, विडी कामगार, फॉरेस्ट वाहतूकदार, ग्रामपंचायत कर्मचारी व शेती व शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व केले.

भाजप पक्षात ते फार रमले नाही म्हणून त्यांनी मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन काँग्रेस पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे. माजी मंत्री हे आपणाला आजही श्रध्देय आहेत. मात्र, भाजपचे शेतकऱ्याबद्दलचे  ध्येयधोरणे मान्य नाही, तर तालुका राष्ट्रवादीबाबत अस्पष्ट भूमिका, केंद्र सरकारच्या शेतकरी धोरणाविरोधात वृत्तपत्रात त्यांनी सडेतोड लिखाण केले होते. त्याचवेळी त्याचा काँग्रेस पक्षात जाण्याचा निर्णय झाला होता.

संगमनेर साखर कारखान्याचे माजी संचालक व अगस्ती कारखान्याचे विद्यमान संचालक मीननाथ पांडे यांनी माजी मंत्री मधुकर पिचड यांचे खंदे समर्थक म्हणून चाळीस वर्षे काम केले.   विधानसभेनंतर राष्ट्रवादीत राहण्याचे ठरविले होते. मात्र, राष्ट्रवादीमध्ये त्यांना सन्मानाची वागणूक मिळाली नाही. 

लोकप्रतिनिधींनी विविध प्रश्नांना हात घालून ते प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक होते. तालुक्याच्या पाटपाण्याचा कालव्यच्या प्रश्नाबाबत त्यांच्याकडून अपेक्षाभंग झाल्याचे पांडे आमच्या प्रतिनिधींशी बोलताना म्हणाले.

मंत्री बाळासाहेब थोरात यांची तालुक्याचे प्रश्न सोडविण्यासाठी निश्चित मदत होईल. त्यामुळे आपण काँग्रेस पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच तारीख घेऊन राष्ट्रीय काँग्रेस पक्षात सहभागी होऊ, तर  जेष्ठ नेते मधुकर भाऊ नवले यांनीही राष्ट्रीय काँग्रेस पक्षात जाण्याचा निर्णय झाला असल्याचे सकाळ शी बोलताना म्हणाले. अहमदनगर

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The big leader of BJP in Akola fell on the neck of Congress