तनपुरे कारखान्याच्या संचालक मंडळाकडून कोट्यवधीचा गैरव्यवहार

विलास कुलकर्णी
Sunday, 4 October 2020

तनपुरे कारखान्यात मागील चार वर्षांत अनागोंदी कारभार झाला. वार्षिक सभेत विषय घेऊन, सभासदांना विश्वासात न घेता कारखान्याच्या व संलग्न संस्थांच्या मालमत्ता विक्रीचे निर्णय घेण्यात आले. वीस कोटींचे भंगार दोन कोटींना विकले. जमिनी कवडीमोलाने विकल्या.

राहुरी : ""डॉ. बाबूराव बापूजी तनपुरे साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने कारखाना व संलग्न संस्थांच्या जमिनी, भंगार, मोलॅसिस कवडीमोलाने विकून कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केला.

आता आसवनी प्रकल्पाचे देशी दारू व स्पिरीट उत्पादनाचे लायसन्स विकण्याचा घाट घातला आहे. जिल्हा बॅंकेने यासाठी परवानगी देऊ नये, अन्यथा सभासद शेतकरी आंदोलन करतील,'' असा इशारा रामदास धुमाळ विचार मंचाचे अध्यक्ष अमृत धुमाळ यांनी दिला आहे. 

मुसळवाडी (ता. राहुरी) येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रवरा शेतकरी मंडळाचे अध्यक्ष अरुण कडू, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उत्तर जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे, पंढरीनाथ पवार, डॉ. जयंत कुलकर्णी, भास्कर जाधव, मच्छिंद्र जाधव, आप्पासाहेब कोहकडे, दत्तात्रेय जाधव उपस्थित होते. 

धुमाळ म्हणाले, ""तनपुरे कारखान्यात मागील चार वर्षांत अनागोंदी कारभार झाला. वार्षिक सभेत विषय घेऊन, सभासदांना विश्वासात न घेता कारखान्याच्या व संलग्न संस्थांच्या मालमत्ता विक्रीचे निर्णय घेण्यात आले. वीस कोटींचे भंगार दोन कोटींना विकले. जमिनी कवडीमोलाने विकल्या.

दोन गळीत हंगामांतील मोलॅसिस विक्रीत मोठा भ्रष्टाचार केला. अगोदरच आर्थिक संकटात असलेला कारखाना आणखी संकटाच्या खाईत लोटला. कारखान्याच्या मागील हंगामातील ऊसबिलांची "एफआरपी' थकीत आहे. कामगारांचे पगारही थकले आहेत.

जिल्हा बॅंकेच्या ताब्यात कारखान्याची मालमत्ता आहे. आसवनी प्रकल्पाचे लायसन्स विक्री करण्यासाठी कारखान्याने ठराव करून जिल्हा बॅंकेकडे परवानगी मागितली आहे. लायसन्स विक्रीस परवानगी मिळाली नाही, तर भाडेतत्त्वावर आसवनी प्रकल्प देण्याचा घाट घातला आहे.'' 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Billions of rupees misappropriated by the board of directors of Tanpure factory