कोतकर ऐनवेळी राष्ट्रवादीत, वार भाजपवर शिवसेनाच घायाळ

अशोक निंबाळकर
Thursday, 24 September 2020

दुसरीकडे शिवसेनेने योगीराज गाडे यांचा अर्ज दाखल करून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. आता ते बहुमत कसे जमवतात, याकडे लक्ष लागले आहे.

नगर : नगर महापालिकेच्या सभापतिपदाच्या निवडणुकीत आणखी एक ट्विस्ट आला आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या खेळीने भाजपसह शिवसेनाही घायाळ झाली आहे.

ही सभापती निवड सहाच महिन्यांसाठी असली तरी राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपने ती प्रतिष्ठेची केली होती. या निवडीसाठी शिवसेनेतील एका गटाने राज्य पातळीवरून फिल्डिंग लावली होती. मात्र, आमदार जगताप यांनी तिसराच डाव टाकल्याने नगरचे राजकीय वातावरण तापले आहे.

सभापतिपदासाठी भाजपकडून नगरसेवक मनोज कोतकर इच्छुक होते. परंतु त्यांनी अचानक महापालिकेतील विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

जगताप यांच्याकडून झालेला हा वार भाजपवर बसला असला तरी खऱ्या अर्थाने शिवसेना घायाळ झाली आहे. स्थायी समितीत राष्ट्रवादीचे पाच आणि शिवसेनेचे पाचपाच नगरसेवक आहेत.राज्यातील महाविकास आघाडीचा नगरमध्ये कित्ता गिरवला जाईल आणि सभापतिपद आपल्याला मिळेल असा त्यांचा कसाय होता. परंतु तो अचानक धुळीस मिळाला.

भाजपने राष्ट्रवादीच्या मदतीने महापालिकेत महापौरपद मिळवले होते. आता स्थायी समितीत त्याचीच पुनरावृत्ती करण्यासाठी त्यांनी डावपेच आखले होते. मात्र, त्यांचा उमेदवारच राष्ट्रवादी पक्षात घेऊन धक्का दिला आहे.

दुसरीकडे शिवसेनेने योगीराज गाडे यांचा अर्ज दाखल करून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. आता ते बहुमत कसे जमवतात, याकडे लक्ष लागले आहे. की तडजोडीच्या राजकारण करून निवडणूक बिनविरोध केली जाते, हे उद्याच समजेल.

शिवसेनेकडे सभापतिपद जाऊ न देता ते राष्ट्रवादीकडे  रहावे, यासाठी आमदार जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली संपत बारस्कर यांनी हे  समीकरण जुळवून आणल्याची चर्चा आहे. भाजपच्या निष्ठावंत गटाने पुन्हा एकदा स्वपक्षीयांवर वार केला आहे. शहरात भाजप ही राष्ट्रवादीच चालवित असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP candidate in NCP at the time