शरद पवार यांच्या खांद्यावरुन उतारा, म्हणजे तुम्ही किती खुजे आहात हे समजेल; आमदार रोहित पवारांवर पडळकरांची टीका

नीलेश दिवटे
Saturday, 10 October 2020

कर्जत- जामखेड विधानसभा मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांनी राज्यातील, देशातील नेत्यांना सल्ले देण्यापेक्षा आपल्या मतदारसंघातील रस्ते दुरुस्त करावेत. शरद पवार यांच्या खांद्यावर बसून ते स्वतःची उंची मोजतात.

कर्जत (अहमदनगर) : कर्जत- जामखेड विधानसभा मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांनी राज्यातील, देशातील नेत्यांना सल्ले देण्यापेक्षा आपल्या मतदारसंघातील रस्ते दुरुस्त करावेत. शरद पवार यांच्या खांद्यावर बसून ते स्वतःची उंची मोजतात.

रोहित दादा तुम्ही त्या खांद्यावरन उतारा म्हणजे तुम्ही किती खुजे आहात हे समजेल, अशी जहरी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे.

नगर- सोलापूर महामार्गावरील खड्डे पाहून मिरजगाव येथे त्यांनी व्हिडीओ केला. आज सकाळी औरंगाबाद येथे जात असताना मिरजगाव येथील नगर- सोलापूर रस्त्यावरील खड्डे आणि दुरवस्था पाहून आमदार पडळकर चकित झाले. त्यांनी तेथे व्हिडिओ काढला तो त्यांनी ट्विटरवर शेअर केला. या वेळी ते बोलत होते.

ते म्हणाले जेष्ठ नेते शरद पवार यांच्या खांद्यावर बसून मी महाराष्ट्रात उंच आहे, हा आभास झालेल्या रोहित पवार यांनी खांद्यावरन खाली उतरावे. मतदारसंघातील कामावर लक्ष द्यावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सल्ले देत बसू नये.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP Gopichand Padalkar criticizes MLA Rohit Pawar