जामखेडमध्ये भाजपचा 'करेक्ट कार्यक्रम', रोहित पवार निशाण्यावर!

Sharad-Pawar-Rohit-Pawar
Sharad-Pawar-Rohit-Pawar

महाराष्ट्रात राज्यसभा निवडणुकांवरून राजकारण रंगलं आहे. येत्या 10 जूनला यासाठी मतदान पार पडणार असून सर्व आमदार आणि मंत्र्यांना विविध ठिकाणी हॉटेलवर ठेवण्यात आलंय. (Rajyasabha Election 2022)

या दरम्यान राज्यातील दहा जागांसाठी विधानपरिषदेची निवडणूक पार पडणार आहे. २० जूनला यासाठी गुप्त मतदान होणार असून त्यासाठी भाजपने पाच नावांची घोषणा केली आहे. यंदा भाजपने प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांची उमेदवारी कायम ठेवली असून अन्य तिघांना नव्याने संधी दिली आहे. यामध्ये उमा खापरे आणि श्रीकांत भारतीय आणि माजी मंंत्री राम शिंदे यांचा समावेश आहे. (MLC Election 2022)

शिंदे यांच्याकडे जामखेडची आमदारकी होती. मात्र २०१९ च्या निवडणुकीत बाजी पलटली. आता भाजपने हा हिशेब चुकता करण्यासाठी राम शिंदे यांना पुन्हा संधी दिली आहे. (Ram Shinde on Vidhanparishand)

Sharad-Pawar-Rohit-Pawar
भाजपाकडून विधान परिषदेसाठी उमेदवार जाहीर; पंकजा मुंडेंचा पत्ता कट

राम शिंदे यांना २०१९च्या विधानसभा निवडणुकीत मोठा पराभवाचा धक्का बसला. निवडणुकीआधीच रोहित पवार यांनी जामखेडमध्ये माती भूसभूशीत केली होती. कार्यकर्त्यांसोबत बैठका, सर्वसामान्यांच्या भेटीगाठी, मतदारसंघातील कार्यक्रम आणि सभांचा धडाका रोहित पवारांनी लावला होता.

यामध्ये तयार झालेलं इमेज ब्रँडिंग त्यांना निवडणुकीत कामी आलं. मंत्रीपदावर असलेल्या राम शिंदे यांचा विधीमंडळात जाण्याचा रस्ताच पवारांनी बंद केला. मात्र आता पुन्हा राम शिंदे विधीमंडळात दिसतील. भाजपने त्यांना विधानपरिषदेवर पाठवण्याचा निर्णय घेऊन रोहित पवार यांना पुन्हा आव्हान तयार करण्याचा प्रयत्न केला आहे.

नगरमध्ये स्कोअर सेटल?

चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांनी जामखेडमध्ये राष्ट्रवादीसोबत स्कोअर सेटल करण्यासाठी ही फिल्डिंग लावल्याची चर्चा आहे. नगरमधून ओबीसी चेहरा देऊन भाजपने शिंदे यांचं पुनर्वसन केलंय. सध्या नगर जिल्ह्यात राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, रोहित पवार, संग्राम जगताप, काळे, किरण लमहाटे आणि निलेश लंके असे सहा आमदार आहेत.

बाळासाहेब थोरात आणि लहू कानडे काँग्रेसचे नेते आहेत. तर, भाजपचे राधाकृष्ण विखे-पाटील आणि बबनराव पाचपुते खिंड लढवत आहेत. याशिवाय मोनिका राजळे यांचाही २०१९ मध्ये विजय झाला. मात्र, राष्ट्रवादीच्या वाढणाऱ्या वर्चस्वाला शह देण्यासाठी भाजपने खेळी केली आहे. थेट जामखेडमधून राम शिंदे यांना रोहित पवारांना तोंड देण्यासाठी मैदानात पुन्हा उतरवलं आहे.

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com