विस्थापित झालेल्या अतिक्रमण धारकांना दहा वर्षापासून मिळेना न्याय 

मनोज जोशी
Tuesday, 1 December 2020

शहरातील विस्थापित झालेल्या अतिक्रमण धारकांना दहा वर्षापासुन न्याय मिळालेला नाही.

कोपरगाव (अहमदनगर) : शहरातील विस्थापित झालेल्या अतिक्रमण धारकांना दहा वर्षापासुन न्याय मिळालेला नाही. याप्रश्नी वारंवार निवेदन देउनही प्रश्न मार्गी लागत नाही. म्हणून कोपरगाव व्यापारी संघर्ष समितीने हाती घेतलेल्या आंदोलनास पाठींबा असून विस्थापितांना न्याय मिळावा हीच आमची भावना असल्याचे भाजप शहराध्यक्ष दत्ता काले यांनी सांगितले.

दत्ता काले बोलतांना म्हणाले की, विस्थापितांचा प्रश्न मार्गी लागावा म्हणून माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी वारंवार बैठका घेउन पाठपुरावा केला.

त्याप्रमाणे नगरपरिषदेच्या 15 एप्रिल2017 रोजी सर्वसाधारण सभेत सर्वानुमते ठरावही मंजुर करण्यात आला. तसेच यापुर्वी माजी मंत्री शंकरराव कोल्हे ,बिपीन कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली तत्कालीन नगराध्यक्ष सुरेखा राक्षे यांच्या कार्यकाळात नगररचना विभागास प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. त्यानुसार प्रधानसचिव यांच्या अभिप्रायानुसार नेमून दिलेल्या जागेवर खोकाशाॕप करणेस सुचविले होते. परंतु आज अतिक्रमण अनेक दिवस उलटूनही नगरपरिपद विस्थापितांना खोकाशाॕप देउ शकली नाही. त्यामुळे विस्थापिंताचे मोठया प्रमाणात हाल झाले. अनेकांना आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला, त्यात सध्याच्या कोरोना महामारीमुळे त्यांच्या अडचणीत भर पडली.

छोटे छोटे व्यवसाय करून उदरनिर्वाह करणारे अनेक कुटूंबावर मोलमजुरी करण्याची वेळ आली. तरीही पालिका या प्रश्नी गांभीर्याने लक्ष देत नसल्याने कोपरगाव व्यापारी संघर्ष समितीने आंदोलन हाती घेतलेल्या आंदोलन जो पर्यंत हा प्रश्न तडीस जात नाही, तोपर्यंत या आंदोलनात शहर भारतीय जनता पार्टी समितीच्या सोबत असल्याचे काले यांनी जाहीर केले. खोका प्रश्न बाबत काहींनी खोटेनाटे वावडे उठवल्याने छोटेमोठे व्यापारी संभ्रमात आहेत. विस्थापितांच्या प्रश्नांवर राजकारण करु नये असा सल्ला देखील दत्ता काले यांनी दिला.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP supports traders agitation in Kopargaon taluka