शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भाजपचे लाक्षणिक उपोषण 

आनंद गायकवाड
Saturday, 14 November 2020

शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई मिळण्यासह विविध मागण्यांच्या न्याय हक्कासाठी भारतीय जनता पक्ष व किसान मोर्चातर्फे संगमनेरातील उपविभागीय कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

संगमनेर (अहमदनगर) : शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई मिळण्यासह विविध मागण्यांच्या न्याय हक्कासाठी भारतीय जनता पक्ष व किसान मोर्चातर्फे संगमनेरातील उपविभागीय कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले. 

मागील महिन्यात झालेल्या अतीवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई व विजमाफीची अंमलबजावणी दिवाळीपुर्वीच व्हावी, अशी मागणी करण्यात आली. दुधाला किमान 25 रुपये खरेदी भाव व दिड रुपया लिटरप्रमाणे रिबेट द्यावे.

सीएससी सेंटरच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी पिक विमा भरला असुनही, अतीवृष्टीने पिकांची नासाडी झाली. परंतु, अद्यापही विमा कंपनीने विम्याचे पैसे अदा केलेले नाहीत. ते त्वरित अदा करावेत. कोरोना काळात झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांकडे कर्ज वसुलीसाठी तगादा करु नये. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आर्थिक पॅकेज जाहीर करावे आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. निवासी नायब तहसीलदार सुभाष कदम यांनी निवेदन स्वीकारले. 

निवेदनावर भाजपा तालुकाध्यक्ष डॉ. अशोक इथापे, शहराध्यक्ष श्रीराम गणपुले, भाजपा किसान मोर्चा उत्तर नगर जिल्हाध्यक्ष सतिश कानवडे, भास्कर दिघे, संतोष रोहम, डॉ. महेंद्र कोल्हे, शिरीष मुळे आदींच्या सह्या आहेत. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP symbolic fast for various demands of farmers