साईंच्या शिर्डीत भाजपचे कार्यालय, पाटलांच्या हस्ते भूमिपूजन

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 13 October 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे कणखर नेते देशाला लाभले. उत्तर नगर जिल्ह्यात पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्यासाठी हे कार्यालय महत्वाचे ठरेल.

शिर्डी ः भाजप हा संघटनात्मक बांधणीवर आधारलेला पक्ष आहे. संघटनेच्या माध्यमातून पक्षाची विचारधारा समाजात रुजविणे, ही पूर्वीपासूनची कार्यपद्धती आहे. त्यात पक्षाच्या कार्यालयाला महत्त्वाचे स्थान आहे.

उत्तर नगर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन शिर्डीत हाती घेतलेली कार्यालय उभारणी संघटनात्मक बांधणीला चालना देईल, असा विश्‍वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. 

पक्षाच्या उत्तर नगर जिल्हा कार्यालयाचे भूमिपूजन पाटील व उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी पाटील बोलत होते. नगराध्यक्ष अर्चना कोते, नगरसेवक शिवाजी गोंदकर, डॉ. राजेंद्र पिपाडा, जिल्हा परिषद सदस्य जालिंदर वाकचौरे, नितीन दिनकर, सचिन शिंदे, सुनील वाणी, श्रीराज डेरे, किरण बोराडे, अशोक पवार, सोनाली नाईकवाडी आदी उपस्थित होते. 

राजेंद्र गोंदकर म्हणाले, की जनसंघाच्या काळापासून पक्षाच्या विचारधारेसोबत असलेली कुटुंबे शिर्डीत आहेत. एकनिष्ठ कार्यकर्त्यांचा संच येथे कार्यरत आहे. सध्या देशभर पक्षासाठी अनुकूल परिस्थिती आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे कणखर नेते देशाला लाभले. उत्तर नगर जिल्ह्यात पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्यासाठी हे कार्यालय महत्वाचे ठरेल.

 संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP's office in Sai's Shirdi