गोरगरिबांच्या धान्याचा काळाबाजार; तक्रार करुनही होईना कारवाई

शांताराम काळे
Monday, 28 September 2020

गोरगरीब जनतेकडे पैसा नसल्याने त्यांना रेशनचे धान्य घेणेही परवडत नाही. याची संधी घेऊन व महसूल, रेशनिंग व्यापारी व सहकारी संस्थांचा संपर्कातील व्यक्ती यांची साखळी असून या माध्यमातून रेशन धान्य घोटी ते अकोले प्रवास करू लागले आहे.

अकोले (अहमदनगर) : तालुक्यात गोरगरीब जनतेकडे पैसा नसल्याने त्यांना रेशनचे धान्य घेणेही परवडत नाही. याची संधी घेऊन व महसूल, रेशनिंग व्यापारी व सहकारी संस्थांचा संपर्कातील व्यक्ती यांची साखळी असून या माध्यमातून रेशन धान्य घोटी ते अकोले प्रवास करू लागले आहे. 

कोरोना असल्याने वाहतुक बंद असताना वाहतूक करणाऱ्या वाहनांवर अत्यावश्यक सेवा बोर्ड लावून व त्यामागे वातानुकूलित गाडी ठेवून हा गोरख धंदा सुरू आहे. सध्या रेशनींगचा गहू, तांदूळ काळ्या बाजारात मोठ्या प्रमाणात जात आहे. अनेक ठिकाणी या गाड्याही पकडल्या. मात्र गावागावात हा तांदूळ व गहू लाभारथी न घेता त्याच्या नावावर खपवून त्याला काही रोख रक्कम देऊन हा माल परस्पर गोडाऊनमधून उचलून त्याची काळ बाजारात विक्री होत आहे. यावर महसूल यंत्रणा मात्र कानावर बोट ठेवून गप्प आहे.

कोरोनाच्या संकटात सापडलेल्या माणसांचा रोजगार गेला. घराबाहेर पडता येत नाही. म्हणून किमान पोटाला पोटभर अन्न मिळावे म्हणून केंद्र सरकारने प्रती महिना केशरी व पिवळे रेशनकार्ड धारकांना निर्धारित धान्य कोटा दुप्पट केला. मात्र हे धान्य अनेक लाभधारक रेशनींग दुकानातून थेट व्यापाऱ्यांच्या दुकानात जात आहे. सध्या गावागावात ही खरेदी विक्रीची दुकानं थाटलेली आहेत. सध्या तीन व्यक्तींच्या कुटुंबाला प्रत्येक महिन्यात १८ किलो गहू व बारा किलो तांदूळ मिळतो. यासाठी निम्मे फुकट तर निम्मे फक्त ३५ रूपयांत मिळते. 

बाजारात याचा भाव तांदूळ १५ रूपये तर गहू १२ रूपये किलो आहे. दर महिन्याला ३५ रूपयांत साडेचारशे रूपये मिळत असल्याने ही विक्री होते. यातून महागडे तांदूळ किंवा इतर धान्य हे ग्राहक घेतात तर कधी रोख रक्कम देखील घेतात.

सध्या अकोले, राजूर, कोतूळ, समशेरपुर अन्य गावात याचे व्यापारी कोण आहेत हे सहज कुणीही सांगते. दोन पैसे मिळण्यासाठी रेशनींग माल खरेदी करणारे अनेक व्यापारी तयार झालेत. त्यातून या मालाची पोलिस यंत्रणेनेला टीप देणारे खबरे देखील वाढले आहेत. महसूल यंत्रणेच्या गाव कारभाऱ्यांना हे माहीत असुनही ते तोंडावर बोट ठेऊन गप्प आहेत.

अकोले ग्राहक पंचायतचे अध्यक्ष मच्छिंद्र मंडलिक म्हणाले, अकोले तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक  गावांत रेशनींग तांदूळ, गहू खरेदी करणारे व्यापारी तयार झालेत. शहरातील झोपडपट्टी भागात तर व्यापारी थेट घरी येतात. हा तांदूळ इतर तांदळाच्या भेसळीसाठी तर गहू आटा, खाद्यपदार्थ बनवण्यासाठी वापरला जात असल्याची चर्चा आहे. पुरवठा, व महसूल यंत्रणेने विकत घेणारे व विकणार्यांवर कारवाई केल्यास हा काळाबाजार बंद होइल.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Black market of ration grains in Akole taluka