
येळपणे येथील एकाच स्वस्त धान्य दुकानदाराच्या दोन दुकानातील 88 गोणी गहू व तांदूळ काळ्याबाजारात विक्रीसाठी जात असताना गावकऱ्यांनी पकडला.
श्रीगोंदे (अहमदनगर) : येळपणे येथील एकाच स्वस्त धान्य दुकानदाराच्या दोन दुकानातील 88 गोणी गहू व तांदूळ काळ्याबाजारात विक्रीसाठी जात असताना गावकऱ्यांनी पकडला. कोरोनाच्या संकटात सरकारने दिलेला मोफत गहू व तांदूळ अशा पध्दतीने गरीबांच्या मुखातून हिरावून घेतला जात होता. हा प्रकार उघड झाला म्हणून रेशनिंगचा काळाबाजार पुन्हा चव्हाट्यावर आला मात्र अशा पध्दतीत अनेक दुकानदारांची साखळी काही अधिकारी, व्यापारी व कर्मचाऱ्यांना हाताशी धरुन बिनधास्तपणे सुरु आहे.
तालुक्यातील मजूर, गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबासाठी सरकारच्या पैशातून येणारे स्वस्त दुकानातील धान्य गरीबाच्या पोटात जात नसून ठराविक लोकांच्या घशात जात असल्याचा प्रकार पुन्हा उघडकीस आला. येळपणे व पोलिसवाडी येथील स्वस्त धान्याचे चालक एकच कुटूंब आहे. मध्यंतरी त्यांच्या दुकानातून स्वस्त धान्याचा गहू व तांदळाच्या 88 गोण्या घेवून जाणारा टेम्पो गावकऱ्यांनी धाडसाने पकडला. हे धान्य घेवून जाणारा पारगावसुद्रीक येथील व्यापारी यापुर्वी अनेकवेळा सापडला आहेत. त्याच्यावर अनेक गुन्हेही दाखल आहेत. याहीवेळी तोच हाती लागला. लोकांनी हा सगळा मुद्देमाल पोलिसांच्या स्वाधिन करण्यापुर्वी त्या व्यापारी व चालकाचे छायाचित्रण करुन घेतले होते.
अशी आहे काळ्याबाजारीच पहिली पध्दत
येळपणे येथील ही चोरी सापडली म्हणून यातील काळाबाजार समोर आला. अन्यथा तालुक्यातून स्वस्त धान्याचा काळाबाजार हा नित्याचा भाग असल्याची माहिती आहे. धान्याचा काळाबाजार करण्याच्या दोन पध्दती सुरु आहेत. त्यातील पहिल्या पध्दतीत महिन्याला मिळणारे सगळेच धान्य शिधापत्रिकाधारक घेत नाहीत. त्यात अनेक कुटूंबाचे धान्य पर्यायाने शिल्लक राहते. दुकानदार पुढच्या वेळी माल भरताना सगळे शिल्लक धान्य दाखवित नाहीत. त्यामुळे ही शिलकीतील धान्य वाढत जाते. कुणीतरी एक जण दरमहिन्याला इतर दुकानदारांकडून शिल्लक राहिलेले धान्य जमा करतो आणि काळ्याबाजारात विकतो.
ही आहे काळ्याबाजाराची दुसरी होलसेल पध्दत..
नगरवरुन धान्याचे वाहन श्रीगोंद्यात येते. तेथून नंतर गावातील दुकानात पोच होते. मात्र नगरवरुन धान्य भरलेले वाहन गोदामाबाहेर पडण्यापुर्वीच चालकाकडे चलन असणे आवश्यक आहे. मात्र काही वाहनचालकांकडे असे चलन नसते. वागन पकडले की चलन मागवून घेतले जाते. विशेष म्हणजे बिगरचलन वहान असले तर त्याच्या वाहनांच्या पाठीमागे त्यांचे लोक वेगळ्या वाहनातून असतात. गेल्या महिन्यात श्रीगोंद्याचे पोलिस निरीक्षक दौलत जाधव यांनी अशीच एक धान्याचे वाहन पकडले होते. त्याच्याकडे चलन नव्हते. मात्र काही तासात ते उपलब्ध करुन दिले. मात्र ते वाहन जर पडकले नसते तर हे धान्य नेमके कुठे गेले याचा कुणालाही मेळ लागत नाही आणि हाच फंडा आहे धान्य काळ्याबाजाराचा.
थेट गावापर्यंत धान्य पोच करण्यासाठी सरकारला मोठा खर्च येतो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे ज्यांच्या वाट्याचे धान्य येते ते दुकानातून घेवून जात नाहीत. त्यामुळे जे शिल्लक राहते ते काळ्याबाजारात जाते. त्यामुळे केवळ स्वस्त धान्य दुकानदारांनाच दोष देण्यात अर्थ नाही. ज्यांचे धान्य शिल्लक राहते त्यांचे सर्व्हेक्षण करुन त्यांना गरज नसेल तर ते धान्य कमी करुन दुकानदारांना दिले तर शिल्लक राहणार नाही.
संपादन : अशोक मुरुमकर