वधूवरांसह वऱ्हाडी मंडळींनी केले रक्‍तदान 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 16 June 2020

जागतिक रक्‍तदान दिनाच्या दिवशीच लग्नसोहळा आयोजित करून, जीवनाची गाठ बांधत वधूवरांसह वऱ्हाडी मंडळींनी रक्‍तदानाचा अनोखा उपक्रम राबविला. त्याद्वारे वधू-वरांनी समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. 

नगर : जागतिक रक्‍तदान दिनाच्या दिवशीच लग्नसोहळा आयोजित करून, जीवनाची गाठ बांधत वधूवरांसह वऱ्हाडी मंडळींनी रक्‍तदानाचा अनोखा उपक्रम राबविला. त्याद्वारे वधू-वरांनी समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. 

कात्रड (ता. राहुरी) येथील दांगट वस्तीवर रविवारी (ता. 14) हा विवाह सोहळा झाला. येथील गोरक्षनाथ दांगट यांची कन्या प्रीती व डोंगरगण (ता. नगर) येथील भास्कर काळे यांचे चिरंजीव किशोर यांचा लग्नसोहळा जागतिक रक्‍तदान दिनाच्या दिवशीच आयोजित केला गेला. किशोर हे महावितरणमध्ये शहर उपविभागात यंत्रचालक म्हणून काम पाहतात.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाउन असल्याने, सर्व नियमांचे पालन करून अवघ्या 25 व्यक्तींच्या उपस्थितीमध्येच विवाह सोहळा झाला. उच्चशिक्षित असलेल्या वधूवरांनी लग्नसोहळ्यात रक्‍तदान शिबिर आयोजित करण्याचा निर्णय आधीच घेतला होता. त्या अनुषंगाने त्यांनी रक्‍तदात्यांना बोलावत शिबिराचे नियोजन केले. डोंगरगण येथील रक्‍तवीर सामाजिक संघटना आणि नगर येथील अर्पण रक्‍तपेढीच्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वी झाला. शिबिरात 21 पिशव्या रक्त संकलित झाले. 
 
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर रक्‍तदान करणे गरजेचे आहे. या काळात रक्‍तदान करण्यास कोणी धजत नाही. मात्र, येथे वऱ्हाडी मंडळींनी स्वयंस्फूर्तीने रक्‍तदान केले. हा उपक्रम समाजासाठी दिशादर्शक आहे. 
- कैलास पटारे, सरपंच डोंगरगण


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Blood donations were made by the bride and groom