राहुरी तालुक्यातील मुळा धरणातून जाणारी बोट पुन्हा बंद झाली

विलास कुलकर्णी
Friday, 23 October 2020

मुळा धरणाच्या अथांग पाण्यातून चालणारी यांत्रिक बोट पुन्हा एकदा नादुरुस्त झाली. त्यामुळे, धरणाच्या पलीकडील वावरथ, जांभळी, जांभुळबन गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे. ग्रामस्थांची ससेहोलपट सुरू आहे.

राहुरी (अहमदनगर) : मुळा धरणाच्या अथांग पाण्यातून चालणारी यांत्रिक बोट पुन्हा एकदा नादुरुस्त झाली. त्यामुळे, धरणाच्या पलीकडील वावरथ, जांभळी, जांभुळबन गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे. ग्रामस्थांची ससेहोलपट सुरू आहे.

राहुरी येथे रस्ता मार्गाने जाणे-येणेसाठी ग्रामस्थांना पारनेर व नगर तालुक्यातून 160 किलोमीटर प्रवास करावा लागत आहे. त्यात, बहुमोल वेळ, मनस्ताप व आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. यांत्रिक बोट वारंवार नादुरुस्त होत असल्याने, नवीन बोट मिळावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

धरणामुळे वावरथ, जांभळी व जांभुळबन या गावांना तीन बाजूने पाण्याचा वेढा असतो. एक बाजूचा रस्ता पारनेर तालुक्यातून जातो. धरणातील पाण्यातून जांभळी ते बारागाव नांदूर दरम्यान १५ मिनिटांत यांत्रिक बोटीतून प्रवास करून, झटपट राहुरीला जाता येते. कामानिमित्त दररोज 350 ते 400 नागरिक बोटीतून प्रवास करतात. शासकीय कर्मचारी, महिला, वृद्ध, आजारी रुग्ण व ग्रामस्थांना यांत्रिक बोट प्रवासाचा एकमेव आधारवड आहे. 

सध्या, धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे, जांभळी ते बारागाव नांदूर दरम्यान धरणातील पाण्याचे अंतर वाढले आहे. एक छोटी होडी आहे. परंतु, ती दुर्घटनाग्रस्त होण्याच्या भीतीने ठेकेदार चालवण्याची हिंमत करीत नाही. दुचाकीवरून प्रवास करणारे ग्रामस्थ चास पुलावरून म्हैसगांव मार्गे राहुरीला जात आहेत. जांभळीतून चारचाकी वाहने व शेतमालाची वाहतूक निंबळक, विळद घाट मार्गे सुरु आहे.

रविवारी (ता. 11) यांत्रिक बोट बंद पडली. दहाव्या दिवशी मंगळवारी (ता. 20) सकाळी बोट सुरू झाली. काल बुधवारी (ता. 21) दुपारी पुन्हा बोट बंद पडली. बोटीतील गिअर बॉक्सची समस्या वारंवार बिघाड निर्माण करीत आहे. बोटीचा पाण्यातील पंखा फिरवणारा शाफ्ट तुटला आहे. नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी प्रसाद शुगरचे तांत्रिक कर्मचारी बोटीच्या दुरुस्तीसाठी पाठविण्याची व्यवस्था केली आहे.

ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत आहेत. महिला, वृद्ध व आजारी रुग्णांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. धरणाच्या पाण्यावर पुल बांधण्याची जुनी मागणी आहे. यांत्रिक बोट वारंवार नादुरुस्त होते. ती कालबाह्य झाली आहे. नवीन आधुनिक बोट मिळण्याची गरज आहे.
- वर्षा बाचकर, अध्यक्ष, वावरथ-जांभळी महीला संघर्ष समिती

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Boat passing through Mula dam in Rahuri taluka closed again

Tags
टॉपिकस
Topic Tags: