
म्हसे व वडगाव शिंदोडी येथे राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या काही नेत्यांसह त्यांचे कार्यकर्ते या वाळूचोरीत होते. अर्थात त्यांना विरोधी पक्षाच्या सहमतीचे अभय होतेच.
श्रीगोंदे : वडगाव शिदोंडी येथे राजकीय आशीर्वादाने सुरु असणारा वाळूचोरांचा तळ शिरुरच्या डॅशिंग महिला तहसीलदार लैला शेख यांच्या धाडसी कारवाईने उदध्वस्त झाला.
श्रीगोंद्यातील महसूल यंत्रणा व बेलवंडी पोलिस ठाणे वाळूचोरांना पाठिशी घालून अर्थपूर्ण तडजोडीत गुंतले असताना शिरुरच्या महिला तहसीलदारांनी सगळ्यांच्या साक्षीने चौदा बोटींचा स्फोट करुन उदध्वस्त केल्या. त्यात वाळूचोरांचे एक कोटींचे नुकसान नुकसान झाले.
म्हसे व वडगाव शिंदोडी येथे राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या काही नेत्यांसह त्यांचे कार्यकर्ते या वाळूचोरीत होते. अर्थात त्यांना विरोधी पक्षाच्या सहमतीचे अभय होतेच.
म्हसे येथे अनेक महिन्यांपासून वाळू उपसा सुरु होता. श्रीगोंद्यातील सगळीच यंत्रणा त्यांनी गुंडाळून ठेवल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचे धारिष्ट्य कुणातच नव्हते. त्यातच गेल्या काही दिवसात वडगाव शिंदोडी येथेही नव्याने वाळूचोरांचा तळ तयार झाला होता.
मोठ्या दिमाखात सरकारचे जावई असल्याच्या अविर्भावात वाळूचोरांनी तेथील नदीपात्र आपसात वाटून घेतले होते.
या सगळ्यांना पुरुन उरल्या शिरुरच्या तहसीलदार लैला शेख. त्यांनी मोठ्या खुबीने तेथील माहिती मिळवली. काढलेली सगळीच वाळू शिरुरच्या हद्दीतून पुढे जात होती. मात्र वाळू वहातुक करणारे वहाने अडविण्यापेक्षा थेट वाळूचोरांच्या अड्यावरच घात करण्याचा निर्णय घेत शनिवारी शेख या त्यांच्या पथकासोबत वडगाव शिदोंडी जवळ आल्या.
घोड नदीपात्रातून त्यांनी काही किलोमीटरचा प्रवास बोटीतून केला. बोटी असणाऱ्या ठिकाणी पोलिस बंदोबस्तात जात तेथील चौदा बोटींचा स्फोट केला. ही कारवाई शनिवारी काही तास सुरू होती. तहसीलदार शेख यांचा दुर्गावतार पाहून त्यांना विरोध करण्याचे कुणीही धाडस केले नाही. दरम्यान या कारवाईबाबत शेख यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो होवू शकला नाही.
म्हसे येथील वाळूचोरांनी आवरला अड्डा,
वडगाव शिंदोडी येथे तहसीलदार शेख यांनी कारवाई करुन वाळू बोटी फोडल्या. त्यामुळे म्हसे येथील वाळूचोरांनी त्यांचा तेथील अड्डा बंद करुन बोटी हलविल्या असल्याची माहिती आहे.
शिरुरच्या महिला तहसीलदाराने हद्द ओलांडून कारवाई केल्याने नगरला नव्याने आलेले पोलिस अधीक्षक अखिलेश सिंह यांना एक आव्हान मिळाले आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची वाळूचोरांविरुध्द कारवाईचे हत्यार म्यान केली की अशी चर्चा पर्यावरणप्रेमींमध्ये आहे.
संपादन - अशोक निंबाळकर