दुष्काळाच्या छायेखाली असलेल्या ‘या’ गावात कूपनलिकेतून येऊ लागले नैसर्गिकरीत्या पाणी

आनंद गायकवाड
Thursday, 20 August 2020

दुष्काळाच्या छायेखाली असलेला तळेगाव पट्टा या वर्षी वरुणराजाच्या कृपेने जलसमृद्ध झाला असून, भूगर्भातील पाणीपातळी वाढल्याने काही ठिकाणी कूपनलिकांमधून पाणी उपळताना आढळत आहे.

संगमनेर (अहमदनगर) : सातत्याने दुष्काळाच्या छायेखाली असलेला तालुक्‍यातील तळेगाव पट्टा या वर्षी वरुणराजाच्या कृपेने जलसमृद्ध झाला असून, भूगर्भातील पाणीपातळी वाढल्याने काही ठिकाणी कूपनलिकांमधून पाणी उपळताना आढळत आहे. 

सतत दुष्काळाच्या छायेखाली असलेल्या तळेगाव पट्ट्यामध्ये या वर्षी निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केल्याने भूगर्भातील पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. या भागातील नान्नज दुमाला, तळेगाव दिघे, देवकौठे, काकडवाडी, चिंचोली गुरव, पिंपळे या गावांतील पाणीपातळी वाढल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. 

पाचवीला पुजलेला दुष्काळ, उत्पादित शेतीमालाला हमी भावाचा अभाव, यामुळे चिंतेत असलेला शेतकरीवर्ग बेभरवशाच्या शेतीकडून उदरनिर्वाहासाठी अन्य व्यवसायांकडे वळला होता. कमी पावसावर जिरायती पिके निघत होती. नान्नज दुमाला परिसरात वृक्षारोपण, लोकसहभागातून "पाणी अडवा, पाणी जिरवा' मोहिमेंतर्गत केलेल्या जलसंधारणाच्या कामाचे फलित म्हणून या परिसरात भूगर्भातील पाणीपातळी यंदा चांगलीच वाढली आहे. त्यामुळे आज गावातील विहिरी, बंधारे व कूपनलिकासुद्धा ओसंडून वाहत आहेत. 

केवळ लोकसहभाग, ग्रामस्थांचे सहकार्य, यातून झालेल्या कामाचा हा चमत्कार असून, पाणीपातळी वाढल्याने विविध पिके मोठ्या प्रमाणात घेता येणार आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत असल्याची प्रतिक्रिया लोकनियुक्त सरपंच भीमराज चत्तर यांनी दिली. केवळ सरपंच किंवा सरकार काही करू शकत नाही. लोकसहभागातून झालेली ही जलक्रांती परिसरासाठी आशादायक ठरणार आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Borewell water due to rain at Talegaon Patta in Sangamner taluka