कोरोनाकाळात दिलासा ः या कर्जदारांना मिळणार तीन टक्क्यांपर्यंत रिबेट

आनंद गायकवाड
Thursday, 6 August 2020

छोट्या व्यावसायिकांसाठी संस्थेची नावाजलेली व इतर आर्थिक संस्थांसाठी आदर्शवत अभिनव कर्ज योजना नव्या स्वरूपात पुन्हा एकदा उपलब्ध करून दिली आहे.

संगमनेर ः कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून करण्यात आलेले सलग तीन महिन्याचे लॉकडाउन व त्यानंतर अटी व शर्तींचे अनलॉक यामुळे आर्थिक क्षेत्रात प्रचंड आर्थिक अस्थिरता निर्माण झाली आहे.

कोरोनाने आर्थिक क्षेत्राचा समतोल बिघडला आहे. अनेक व्यवसाय उद्योगधंद्यांचे आर्थिक व्यवहार मंदावले आहेत. हे सर्व सुरळीत होण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे छोटे-मोठे व्यापारी, व्यवसायिक व उद्योगधंद्यांना थोडा आर्थिक दिलासा देण्याच्या दृष्टीने श्री यशोदेव पतसंस्थेच्या संचालक मंडळाने चालू आर्थिक वर्षापासून कर्जदारांना मोठ्या प्रमाणात अतिरिक्त रिबेट देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याची माहिती प्रदीपभाई शाह यांनी दिली आहे.

हेही वाचा - रोहित पवार धावले मंत्री आदित्य यांच्या मदतीला

या बाबत अधीक माहिती देताना संस्थेचे अध्यक्ष डॉ. अजित वखारिया व उपाध्यक्ष सुरेश जोशी यांनी सांगितले की, सर्व प्रकारच्या कर्जासाठी रिबेट दरात 0.50 टक्के ते 3 टक्क्यांपर्यंत अतिरीक्त रिबेट 1 एप्रिल 2020 पासून वसूल होणाऱ्या व्याजावर दिले जाणार आहे. या निर्णयामुळे एका आर्थिक वर्षात कर्जदारांच्या खात्यावर सुमारे 75 लाख रुपये अधिकचे रिबेट जमा होणार आहे. मार्च 2020 नंतर संस्थेच्या 99 टक्के कर्जदारांनी या अडचणीच्या परिस्थितीतही आपले कर्ज खाते नियमित ठेवलेले आहे.

त्यामुळे संस्थेने उत्तरदायित्व व सामाजिक बांधिलकी म्हणून नफा तोट्याचा फारसा विचार न करता हा स्तुत्य निर्णय घेतला आहे. व्यवसाय, जमीन व गृह तारण कर्जासाठी निव्वळ व्याजदर 11 टक्के, हायरपरचेस कर्जासाठी 10 टक्के तर सोनेतारण कर्जासाठी किमतीच्या 80 टक्के कर्ज उपलब्ध असून त्यावर निव्वळ 9 टक्के व्याजदर आकारण्यात येणार आहे.

त्याचबरोबर छोट्या व्यावसायिकांसाठी संस्थेची नावाजलेली व इतर आर्थिक संस्थांसाठी आदर्शवत अभिनव कर्ज योजना नव्या स्वरूपात पुन्हा एकदा उपलब्ध करून दिली आहे. या योजनांचा जास्तीत जास्त व्यावसायिकांनी लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. 

संस्थेच्या या लोकाभिमुख निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. या प्रसंगी संस्थेचे संचालक तसेच व्यवस्थापक रमेश सातपुते व त्यांचे सर्व सहकारी कर्मचारी उपस्थित होते.
संपादन ः अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Borrowers of Shri Yashodev Patsanstha will get rebate up to three percent