ब्रेकिंग! श्रावणातील तिसऱ्या सोमवारनिमित्त गंगास्नानासाठी गेलेले दोघे गोदावरीत बुडाले

गौरव साळुंके
Monday, 10 August 2020

गोदावरी नदीपात्रात गंगास्नानासाठी श्रावण महिन्यात गेलेले दोघे तरुण पाण्यात बुडाले. तालुक्यातील महांकाळ वाडगाव परिसरात गोदावरी नदीत आज सकाळी ही घटना घडली.

श्रीरामपूर (अहमदनगर) : गोदावरी नदीपात्रात गंगास्नानासाठी श्रावण महिन्यात गेलेले दोघे तरुण पाण्यात बुडाले. तालुक्यातील महांकाळ वाडगाव परिसरात गोदावरी नदीत आज सकाळी ही घटना घडली. 

श्रावण महिन्यातील आज तिसरा सोमवार असल्याने पहाटेच्या सुमारास सचिन वानखेडे (वय.२८) व भाऊराव वानखेडे (वय.३५, दोघेही रा.महांकाळ वाडगाव) गोदावरी नदीवर गंगास्नासाठी गेले होते. गंगास्नान केल्यानंतर नदी काढावरील महादेवाच्या मंदिरात दर्शनासाठी जाताना दोघांही नदीतील वाहत्या पाण्याचा अंदाज न आल्याने ते नदीत वाहुन गेले. सदर घटनेची माहिती वारयासारखी नदी परिसरात पसरल्यानंतर अनेकांनी मदतीसाठी धाव घेतली. 

गोदावरी नदी पट्यात सकाळपासुन शोधकार्य सुरु असुन नावेच्या मदतीने भाऊराव यांचा मृतदेह सापडला आहे. तर अद्याप सचिनसाठी शोधकार्य सुरु आहे.

गेल्या आठ दिवसात नाशिक परिसरात जोरदार झालेल्या पावसामुळे सध्या गोदावरी नदी दुथडी भरुन वाहत आहे. नदीतील वाहत्या पाण्याचा अंदाज न आल्याने दोंघेही नदीत वाहुन गेल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. हा प्रकार परिसरातील ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मदतीसाठी धावाधावा केली. परंतू पाण्याचा विसर्ग अधिक असल्याने त्यांना वाचविण्यात अपयश आले. 

स्थानिक प्रशासनाने नुकतीच घटनास्थळी भेट देवुन पहाणी केली. सध्या नदी पट्यात सचिनचा शोध सुरु असुन भाऊरावचा मृतदेह येथील रुग्णालयात उत्तरणीय तपासणीसाठी पाठविला आहे. सचिन आणि भाऊराव दोघेंही चुलत भाऊ असुन दोंघेही विवाहीत होते.

सचिन मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी व आईवडील असा परिवार आहे. तर भाऊराव मागे पत्नी, एक मुलगा, तीन मुली, आईवडील असा परिवार आहे. सदर घटनेमुळे वानखेड कुटूंबासह महांकाळ वाडगाव परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान, पोलिस निरिक्षक मसुद खान यांच्यासह तालुका पोलिस पथकाचे नदी परिसरात शोधकार्य सुरु आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Both drowned while swimming in Godavari river in Shrirampur taluka