पुणे, खडकी, देहू रोड, नगरसह राज्यातील कॅन्टोन्मेंट बोर्ड बरखास्त, राजकीय चर्चेला उधाण

अमित आवारी
Wednesday, 3 February 2021

संरक्षण मंत्रालयाच्या निर्णयानंतर संबंधित क्षेत्रातील राजकीय वर्तुळात हालचाली गतिमान झाल्या आहेत. संबंधित क्षेत्र महापालिका जोडण्याचा किंवा तेथेच स्वतंत्र नगर परिषद निर्माण होणार असल्याची चर्चाही सुरू झाली आहे.

अहमदनगर : ः राज्यात नगर, पुणे, खडकी, देहू रोडसह राज्यातील सात व देशभरातील 56 छावणी परिषदा (कॅन्टोन्मेंट बोर्ड) आहेत. या बोर्डाविषयी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. संरक्षण विभागाकडूनही तसे संकेत मिळाले आहेत.

संरक्षण मंत्रालयाच्या निर्णयानंतर संबंधित क्षेत्रातील राजकीय वर्तुळात हालचाली गतिमान झाल्या आहेत. संबंधित क्षेत्र महापालिका जोडण्याचा किंवा तेथेच स्वतंत्र नगर परिषद निर्माण होणार असल्याची चर्चाही सुरू झाली आहे.

या कॅन्टोन्मेंट बोर्डामुळे स्थानिक विकासात अडथळा येत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी होत्या. त्यामुळे अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्ड नगर महापालिकेला जोडण्याची मागणी होत होती.

अहमदनगर छावणी परिषदेची मुदत 10 फेब्रुवारीला संपत आहे. ही मुदत संपल्यावर छावणी परिषद बरखास्त करण्यात येईल. राज्यातील आणि देशातील बोर्डांबाबतही तसाच निर्णय झाला आहे, अशी माहिती छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार यांनी दिली. 

हेही वाचा - तुम्ही बिगर एनए प्लॉट घेतल्यास असल्यास

संरक्षण विभागाच्या प्रधान निदेशकांनी तसे पत्र येथील छावणी परिषदेला पाठविले आहे. 10 फेब्रुवारी 2020 रोजी सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे. परंतु, छावणी परिषदेच्या कायद्यात सहा महिने कार्यकाळ वाढवून देण्याची तरतूद आहे. त्यामुळे या सदस्यांना दोन वेळा कार्यकाळ वाढवून मिळाला. आता ही मुदत संपत असल्याने छावणी परिषद 11 फेब्रुवारीला बरखास्त होणार आहे.

वरिष्ठ कार्यालयाकडून सूचना येईपर्यंत छावणी परिषदेचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी या द्विसदस्यांमार्फत बोर्डाचा कारभार पाहिला जाईल.

संरक्षण मंत्रालयाने लोकांचा प्रतिनिधी म्हणून एखाद्याची नेमणूक केल्यास संबंधित व्यक्‍तीसह त्रिसदस्य समिती कारभार सांभाळेल. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Breaking News Pune, Khadki, Dehu Road, Nagar and other cantonments in the state will be sacked