मोठी बातमी... राशीनला आलेली मुंबईची मृत महिला कोरोना पॉझिटिव्ह, रिक्षावाल्याचे कुटुंबच बाधित

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मे 2020

नगर शहरातील जुना मंगळवार बाजार येथील कोरोना बाधीत आढळलेल्या रिक्षाचालकाच्या पत्नी, मुलगा आणि मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

नगर - नगरमध्ये कोरोनाने पुन्हा जोर धरला आहे. दररोज एकेना एक पॉझिटिव्ह सापडत आहे. उद्यापासून जिल्ह्यात व्यवहारसुरू आहेत आणि त्याच्या पूर्वसंध्येला अशी मनहूस खबर आली आहे. त्यामुळे हे काळजी करण्यासारखेच आहे.

जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या १७ पैकी १३ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर काल  नगर शहरातील जुना मंगळवार बाजार येथील कोरोना बाधीत आढळलेल्या रिक्षाचालकाच्या पत्नी, मुलगा आणि मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

या शिवाय कर्जत तालुक्यातील तालुक्यातील राशीन येथे सुनेकडे आलेल्या मूळच्या मुंबईकर असलेल्या 75 वर्षीय महिलेचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे आता जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ७२ झाली आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली.

आज सायंकाळी हे सर्व अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये नगर शहरातील रिक्षा चालकाच्या कुटुंबातीलच तिघेजण बाधित आढळून आले.
मूळच्या मुंबईकर येथील 75 वर्षीय वृद्ध महिला राशीन येथे सुनेच्या माहेरी आल्या होत्या. त्यांना त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आला होता.

आज तो अहवाल प्राप्त झाला. त्यात या महिलेस कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. मात्र, तत्पूर्वीच त्यांचे निधन झाले आहे. या मुंबईकर महिलेच्या रूपाने कर्जत तालुक्यातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे कर्जतकर धास्तावले आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Breaking... reports of four are positive