हरियाणातील मुऱ्हा म्हैस, करतेय शेतकऱ्याची सगळी हौस; देते कोट्यवधीचे उत्पन्न

सतीश वैजापूरकर
Sunday, 11 October 2020

मुऱ्हा तिच्या म्हशी धिप्पाड, लांबीला अधिक असतात. शिंगाचे गोल वेटोळे, ही त्यांची आणखी एक खासीयत. मात्र, धष्टपुष्ट दिसणारी म्हैस दुधाळ असेलच, याची खात्री नसते. त्यामुळे त्यांच्या खरेदीसाठी हरियाणातील रोहतक ते पानिपत या भागात समक्ष जावे लागते. तेथे दोन दिवस मुक्काम करायचा.

शिर्डी ः हरियाणातील प्रसिध्द मुऱ्हा या दुधाळ जातीच्या शंभर म्हशींचा अद्ययावत गोठा माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप रोहोम यांनी साकुरी येथे तयार केला. त्यासाठी कडधान्ये व सरकीचा वापर करून घरीच पशूखाद्य तयार करणारी यंत्रणा उभारली. नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाने निश्‍चित केलेला फार्म्युला वापरला.

म्हशींना दोन वेळा अंघोळ घालण्याची सुविधा, गोठ्यातील स्वच्छता व सरासरी दूधउत्पादन वाढविण्यासाठी उपाययोजना केल्या. हरियाणाप्रमाणे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हा गोठा पाहण्यासाठी शेतकरी साकुरी येथे येत आहेत. 

रोहोम म्हणाले, की हरियाणातील मुऱ्हा जातीच्या म्हशीची देशभर विक्री होते. तुलनेत अधिक दूध, लवकर गर्भधारणा होत असल्याने या म्हशींना अधिक मागणी आहे. हरियाणाच्या अर्थकारणात मुऱ्हा म्हशींचा वाटा फार मोठा. तथापि आपल्याकडे त्यांचे संगोपन करणे जिकिरीचे आहे. ही थंड हवामानातील जात आहे.

या म्हशींनी रोज किमान दोन वेळा अंघोळ घालावीच लागते. एक ते दीड लाखांपर्यंत किंमत असलेली ही म्हैस रोज 10-12 लिटर दूध देते. त्यासाठी येणारा खर्च व उत्पन्नाचा ताळमेळ बसविताना कसरत करावी लागते. केवळ भांडवल आहे, म्हणून हा व्यवसाय करायचा ठरविला, तर व्यवस्थापनाअभावी अडचणीत येऊ शकतो. 

मुऱ्हा तिच्या म्हशी धिप्पाड, लांबीला अधिक असतात. शिंगाचे गोल वेटोळे, ही त्यांची आणखी एक खासीयत. मात्र, धष्टपुष्ट दिसणारी म्हैस दुधाळ असेलच, याची खात्री नसते. त्यामुळे त्यांच्या खरेदीसाठी हरियाणातील रोहतक ते पानिपत या भागात समक्ष जावे लागते. तेथे दोन दिवस मुक्काम करायचा.

प्रत्यक्ष किती दूध देते, याची खात्री करून म्हशींची निवड करायची. दिसायला जवळपास सगळ्या सारख्याच असल्याने निवडलेल्या म्हशीची किंमत नक्की करून कानाला टॅग मारावा लागतो. 
हरियाणात या म्हशींची निगा ठेवण्याची कला तेथील महिलांनी परंपरेने आत्मसात केली आहे. थंड हवामान व सकस वैरण, यामुळे ही दुधाळ जात तेथे जेवढी दूध देते, तेवढी आपल्याकडे देत नाही. मात्र, योग्य व्यवस्थापन करून सरासरी दूधउत्पादन वाढविता येते. म्हशीचे संगोपन करणे, हे कष्टाचे काम आहे. त्यासाठी मजूर धजावत नाहीत. त्यामुळे उत्तर प्रदेशातील मजुर या कामासाठी आणले आहेत. 

शुध्द दुधापासून बनवतात मिठाई

शंभर गायी-म्हशी ज्याच्या घरी त्याचीच मिठाई शुध्द खरी, असे रोहोम यांचे घोषवाक्य आहे. रोहोम यांच्याकडील दूध हे विनाभेसळीचे असते, ही परिसरातील लोकांना माहिती आङे. त्यांच्याकडील गीर गाईचे दूध साठ रूपये लिटरने विकले जाते. ते शुद्ध दुधापासून मिठाई करतात. ही मिठाई ग्राहकांच्या पसंतीला उतरते आहे. पूर्वी हे रोहोम म्हशीवाले म्हणून ओळखले जायचे. परंतु आता त्यांची ओळख मिठाईवाले रोहोम अशी झाली आहे. त्यांनी दुधाच्या व्यवसायात सचोटी जपली आहे, म्हणून त्यांची ख्याती झाली आहे. 

गुजरातमध्ये गीर जंगल आहे. जामनगर परिसरातील गिर जाफर ही दुधाळ जात प्रसिद्ध आहे. आम्ही तेथून या जातीच्या 20 म्हशी आणल्या. त्या दूधही अधिक देतात. मात्र, त्यांच्यात वेळेवर गर्भधारणा होत नाही. ही समस्या दूर करण्यासाठी आहारातील बदल व अन्य उपाययोजना करीत आहोत. 
- दिलीप रोहोम, माजी सदस्य, जिल्हा परिषद 

म्हशींचे संगोपन करताना अधिक दुधासह उत्पादित होणाऱ्या दुधात फॅट अधिक असणे महत्त्वाचे. त्यासाठी पोषक आहार त्यांना द्यावा लागतो. उत्पन्न व उत्पादनखर्चाचा ताळमेळ बसविण्यासाठी बारकाईने लक्ष द्यावे लागते. 
- साहिल रोहोम, संचालक, रोहोम डेअरी फार्म 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The buffalo gave the farmer a large income