देवगावमध्ये पत्रकाराची घरफोडी; एक लाख 66 हजाराचा मुद्देमाल लंपास

सुनील गर्जे
Thursday, 3 September 2020

देवगाव येथील पत्रकार फिरोज नसीर शेख यांच्या राहत्या घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी रोख रक्कम व सोने असा एक लाख 66 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. दरम्यान लोखंडी पत्र्याचे कपाट उघडण्याचा आवाज आल्याने घरातील सदस्य उठल्याने चोरट्यांनी धूम ठोकली. ही घटना गुरुवार (ता. 3) रोजी पहाटे घडली.

नेवासे (नगर) : तालुक्यातील देवगाव येथील पत्रकार फिरोज नसीर शेख यांच्या राहत्या घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी रोख रक्कम व सोने असा एक लाख 66 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. दरम्यान लोखंडी पत्र्याचे कपाट उघडण्याचा आवाज आल्याने घरातील सदस्य उठल्याने चोरट्यांनी धूम ठोकली. ही घटना गुरुवार (ता. 3) रोजी पहाटे घडली.

याप्रकरणी फिरोज नसीर शेख (वय 32, रा.देवगाव,ता.नेवासे) यांनी नेवासे पोलिसांत तक्रार दिली. त्यात त्यांनी गुरुवारी पहाटे तीन-साडेतीन वाजण्याच्या सुमारास घरात आई झोपली होती. त्या खोलीतील लोखंडी कपाट उघडण्याचा आवाज आला असता आईला जाग आली. त्यावेळी आम्हाला घरात एक चोर दिसल्याने आईने आरडाओरड केल्यावर चोरट्याने धूम ठोकली.

दरम्यान आईच्या आवाजाने घरातील सर्वजण जागे झाले. आम्हाला घराचा मुख्य दरवाजा व कडी-कोयंडा तोडल्याच्या अवस्थेत उघडा दिसला. दरम्यान शेख यांनी घरातील इतर खोल्यांची पाहणी केली असता तेथील सामानाची उचकापाचकीबरोबरच त्यांच्या बिछान्याखाली ठेवलेले वीस हजार रुपये व दिडतोळा सोन्याचे दागिने व चांदीचे चार जोडवे तसेच शेजारील खोलीतील डब्बे ठेवलेले रोख 1 लाख रुपये चोरीस गेले. 

दरम्यान घटना समजताच पोलीस निरीक्षक रणजित डेरे हे पोलिसांसह घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पोलिसांनी श्वान पथक व ठसे तज्ञांना प्राचारण केले होते. मात्र श्वानाने मुख्य रस्त्यापर्यंत मार्ग काढला. याप्रकरणी नेवासे पोलीसांत अज्ञात चोरटयाविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

गुंगीचे औषधांचा 'स्प्रे' मारल्याचा संशय... 

शेख यांच्या आईला घरात एकच चोर दिसला. मात्र या दुमजली इमारतीचे तीन दरवाजे चोरट्यांनी तोडले. तसेच फिरोज शेख यांच्या पायथ्याशी असलेला टेबल व त्यांच्या बिछान्या खालील रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरट्यांनी काढून घेतले. तरीही त्यांच्यासह परिवारातील एकालाही कोणताच आवाज आला नाही, हे विशेष होते. दरम्यान, आरडाओरड झाल्याने जाग आल्यावर शेख कुटुंबियांच्या सदस्यांच्या नाकात थोडी आग होत होती, असे त्यांनी सांगितले. यावरूनच चोरट्यांनी चोरी करतांना गुंगीचे औषधांचा 'स्प्रे' मारल्याचा संशय व्यक्त होत आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A burglary has taken place at a journalists house in Devgaon