
विजेच्या खांबावर झालेल्या शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली, अशी माहिती मिळताच संगमनेर थोरात कारखान्याच्या अग्निशामक बंबाने घटनास्थळी धाव घेतली .
संगमनेर ः तालुक्यातील ओझर खुर्द शिवारात विजेच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने या परिसरातील पाच शेतकऱ्यांच्या आठ एकर उसाचे क्षेत्र आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. ही घटना आज दुपारी साडेबारा ते एकच्या सुमारास घडली.
आगीमुळे आठ ते नऊ लाखांची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. मनोली ते ओझर खुर्द रस्त्यालगतच्या क्षेत्रातील दौलत बनवाले यांच्या शेतातील एक हेक्टर, बाबासाहेब बनवाले यांचा एक हेक्टर आणि राजेंद्र व संजय बाळासाहेब शिंदे यांच्या शेतातील प्रत्येकी 24 गुंठे व प्रभाकर बाबुराव पराड यांचा दोन एकर ऊस जळाला.
विजेच्या खांबावर झालेल्या शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली, अशी माहिती मिळताच संगमनेर थोरात कारखान्याच्या अग्निशामक बंबाने घटनास्थळी धाव घेतली तसेच या परिसरातील ग्रामस्थ व युवकांनीही धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला.
या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सरपंच पुंजाहरी शिंदे, बकचंद साबळे, झुंगाराम साबळे, गणेश शेपाळ, शांताराम शिंदे, पुंजाजी शिंदे, शांताराम पांडे, शिवाजी शेजुळ, बाळासाहेब शिंदे, शिवाजी शिंदे, संजय दिवे यांनी केली.