पंतप्रधान मोदी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे नगर जिल्ह्यात दहन

विलास कुलकर्णी
Tuesday, 1 December 2020

नवी दिल्ली येथे केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांच्या विरुद्ध शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाची धग ग्रामीण भागात पोहोचली आहे.

राहुरी (अहमदनगर) : नवी दिल्ली येथे केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांच्या विरुद्ध शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाची धग ग्रामीण भागात पोहोचली आहे. टाकळीमिया (ता. राहुरी) येथे मंगळवारी सकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे केंद्र सरकारच्या निषेधाच्या घोषणा देऊन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला.

स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष (उत्तर) रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी टाकळीमिया येथे बाजार तळावर आंदोलन केले.  कृषी कायद्याविरुद्ध दिल्लीत सुरू असलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनावर लाठीहल्ला केल्याने स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारचा तीव्र निषेध व्यक्त केला. संतप्त कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मोदी यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला.

"कृषी कायद्यात बदल न झाल्यास देशभरात शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा वणवा पेटेल. स्वाभिमानीतर्फे राज्यातील ग्रामीण भागात आंदोलने छेडली जातील. दिल्ली येथे शेतकरी आंदोलनात भाग घेण्यासाठी येत्या तीन दिवसात नगर जिल्ह्यातील स्वाभिमानी'च्या २५ कार्यकर्त्यांसह दिल्लीच्या दिशेने रवाना होणार आहे." असे स्वाभिमानी'चे जिल्हाध्यक्ष मोरे यांनी सांगितले.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Burning of symbolic statue of Prime Minister Modi in Nagar district