लूटीचा फंडा, सोशल मीडियातून गंडा!

दौलत झावरे
शुक्रवार, 15 मे 2020

सोशल माध्यमातून ठगविण्याचा धंदाच जिल्ह्यात काही दिवसांपासून सुरू आहे. मात्र, या टोळीत राज्यासह बाहेरील काहींचा समावेश असण्याची शक्‍यता आहे. 

नगर : कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. त्यामुळे अनेकांच्या हाताला काम राहिलेले नाही. परिणामी, पैसे कमाविण्यासाठी काहींनी सोशल मीडियाद्वारे लोकांना गंडा घालण्याचा नवीन धंदा सुरू केला आहे. त्यांच्या जाळ्यात अनेक जण अडकल्याचे पुढे आले आहे. 

कोरोनामुळे अनेक जण घरातच असून, सोशल मीडियाचा वापर करीत आहेत. त्यातून अनेकांचे मित्र वाढत आहेत. या संधीचा काहींनी फायदा उठविण्यास सुरवात केली आहे. सोशल माध्यमातून मैत्री करून काहींनी पैसे लाटण्यास सुरवात केली आहे. त्यात "फेसबूक'चा सर्वाधिक वापर होताना दिसतो.

अकाऊंट हॅक

"फेसबूक'वर ठराविक लोकांचे "अकाऊंट' शोधून त्यावरून ई-मेल व मोबाईल क्रमांकाच्या साहाय्याने अकाऊंट हॅक केले जाते. काहींचे त्याच नावाचे दुसरे अकाऊंट सुरू करून, त्याच्या मित्रांना सहभागी करून घेतले जाते. 

फसवणूक होऊनही अनेक जण गप्प

"सध्या पैशांची अडचण आहे. मुलगा किंवा बायको आजारी आहे' अशी कारणे सांगून "गुगल पे', "फोन पे', "भीम' ऍपवर पैसे जमा करण्याची विनंती केली जाते. मित्र-मैत्रीण व नातेवाईक अडचणीत असल्याचे समजून काही सढळ हाताने मदत करतात. परंतु, मदत केल्यानंतर तेथील परिस्थितीचा अंदाज घेतला असता, संबंधिताने असे पैसे मागितलेच नव्हते, असे स्पष्ट होते. अनेक जण फसवणूक होऊनही पोलिसांत तक्रार करण्याऐवजी गप्प राहतात. त्यामुळे या ठगांचे फावते आहे.

सोशल माध्यमातून ठगविण्याचा धंदाच जिल्ह्यात काही दिवसांपासून सुरू आहे. मात्र, या टोळीत राज्यासह बाहेरील काहींचा समावेश असण्याची शक्‍यता आहे. 

हे करा 

  • सोशल मीडियावरील अकाउंटचा पासवर्ड बदलत राहा 
  • खात्री पटली तरच मैत्री करा 
  • वादग्रस्त पोस्ट दिसल्यास प्रबोधन करा 
  • मदत मागणाऱ्या मित्राला संपर्क करून माहिती घ्या 
  • मोबाईल क्रमांक व इतर माहिती गुप्त ठेवा 

हे टाळा 

  • अनोळखी लोकांचे मैत्रीचे निमंत्रण स्वीकारू नका 
  • मित्र नसताना संदेशांना रिप्लाय करू नका 
  • फेसबूकवर मोबाईल क्रमांक ठेवू नका 
  • मोबाईल क्रमांक किंवा जन्मतारखेचा पासवर्ड नको 
  • फेसबूकवरील व्हिडीओ पाहणे सोडा 

पैशाची गरज असल्याचे भासवून लूट

कोरोनामुळे बेरोजगारी वाढली आहे. त्यातून काही जण पैशांसाठी सोशल मीडियावर दुसऱ्यांच्या नावे बनावट खाते तयार करून पैशाची गरज असल्याचे भासवून लूटत आहेत. त्यामुळे सोशल मीडियावरील आवाहनावरून कोणालाही पैसे पाठवू नका. 
- अरुण परदेशी, पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The business of cheating through social media in Nagar