esakal | कोणच येईना कामाला...मजूर गेले गावाला, पारनेरचे व्यवसाय मजुरांअभावी लॉकडाउन
sakal

बोलून बातमी शोधा

Business in Supa locks down due to lack of laborers

तालुक्‍यातून सुपे औद्योगिक वसाहतीमधील सात हजार व निघोज परिसरातील बागायत पट्ट्यातील किमान पाच हजारांवर मजूर तालुका सोडून आपापल्या गावी गेले आहेत. त्याचबरोबर बांधकाम व्यवसायात असणारे उत्तर प्रदेश, राजस्थान व इतरही राज्यांतील अनेक कामगार गावी गेल्याने सध्या बांधकाम व्यवसाय अडचणीत सापडला आहे.

कोणच येईना कामाला...मजूर गेले गावाला, पारनेरचे व्यवसाय मजुरांअभावी लॉकडाउन

sakal_logo
By
मार्तंड बुचुडे

पारनेर ः लॉकडाउन संपले, मॉन्सून व मॉन्सूनपूर्व पाऊसही चांगला झाला. तालुक्‍यात आता खरी अडचण आहे बांधकाम व्यवसायातील व शेतीकामासाठी लागणाऱ्या मजुरांची. बांधकाम व्यावसायिक व शेतकरीही मजूर मिळेनासे झाल्याने आता डोक्‍याला हात लावून बसले आहेत. 

अनेक उद्योग-व्यावसायिकांवर मजुरांअभावी व्यवसाय बंद ठेवण्याची वेळ आली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशात व राज्यातही लॉकडाउन जाहीर झाले. अनेक उद्योग-व्यवसाय बंद झाले आहेत. अनेकांचा रोजगार गेला आहे. हातावर पोट असणाऱ्या मजुरांची उपासमार सुरू झाली आहे. त्याबरोबरच कोरोनाच्या भीतीमुळे बहुतेक मजुरांनी आपल्या घरचा रस्ता धरला आहे. अनेक मजुरांनी पायपीट करत हजारो किलोमीटरचा पायी प्रवास करून घर गाठले आहे.

हेही वाचा - तुम्ही फेसबुकवर मोबाईल नंबर टाकला असेल तर होईल असं

तालुक्‍यातून सुपे औद्योगिक वसाहतीमधील सात हजार व निघोज परिसरातील बागायत पट्ट्यातील किमान पाच हजारांवर मजूर तालुका सोडून आपापल्या गावी गेले आहेत. त्याचबरोबर बांधकाम व्यवसायात असणारे उत्तर प्रदेश, राजस्थान व इतरही राज्यांतील अनेक कामगार गावी गेल्याने सध्या बांधकाम व्यवसाय अडचणीत सापडला आहे.

तसेच शेतीकाम करणारे मराठवाडा विदर्भातील मजूरही गावी गेल्याने शेतीकामासाठी मजूर मिळेनासे झाले आहेत. त्यामुळे बांधकाम व्यवसाय व शेती व्यवसाय अडचणीत सापडले आहेत. नगर-पुणे महामार्गावर असणाऱ्या लहान-मोठ्या अनेक हॉटेलांमधील कामगारही गावी गेल्याने हॉटेल व्यवसायही अडचणीत सापडला आहे. सध्या हॉटेल सुरू न झाल्याने त्यांना फारशी अडचण भासत नाही. मात्र, अनेक हॉटेलमध्ये स्वतः मालक काम करताना दिसत आहेत. 

बांधकाम व्यवसाय व फर्निचरचे काम करणारे मजूर मिळेनासे झाल्याने बांधकाम व्यवसायात काम करणारे ठेकेदार अडचणीत सापडले आहेत. अनेकांची बांधकामे अर्धवट अवस्थेत आहेत. सध्या फरशी बसविण्याचे व फर्निचर तयार करणारे मजूर नसल्याने ती कामेही मोठ्या प्रमाणात थांबली आहेत. लॉकडाउन शिथिल होताच व पाऊस झाल्याबरोबर कामगारांची कमतरता भासू लागली आहे. इतके दिवस लॉकडाउन व शेतीकामे नसल्याने या मजुरांची आठवण झाली नाही. मात्र, आता त्यांची आठवण होत आहे.