
महापालिका, नगरपालिका व प्रभाव क्षेत्रात स्थावर मालमत्ता खरेदी-विक्रीवर चार टक्के मुद्रांक शुल्क व ग्रामीण भागात तीन टक्के मुद्रांक शुल्क आकारले जाणार असल्याचे मुद्रांक जिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांनी सांगितले.
नगर ः राज्य सरकारने एक सप्टेंबरपासून दिलेली 2 टक्के मुद्रांक शुल्क सवलतीची मुदत आज संपली. त्यामुळे उद्यापासून (ता. 1) मुद्रांक शुल्कात अर्धा, तर सेसमध्ये अर्धा टक्के वाढ होणार असल्याने, नववर्षात स्थावर मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार महागणार आहेत.
सरकारच्या 1 सप्टेंबरच्या आदेशानुसार महापालिका, नगरपालिका व प्रभाव क्षेत्रात (गावांची होणारी वाढ) मुद्रांक शुल्क सहावरून तीन टक्के केले होते. ग्रामीण भागात मुद्रांक शुल्क पाचवरून दोन टक्के केले होते. त्याची मुदत आज संपली. त्यामुळे उद्यापासून (ता. 1) मुद्रांक शुल्क अर्धा टक्के, तर महापालिका, नगरपालिका व जिल्हा परिषद क्षेत्रातील सेस अर्धा टक्के वाढणार आहे.
महापालिका, नगरपालिका व प्रभाव क्षेत्रात स्थावर मालमत्ता खरेदी-विक्रीवर चार टक्के मुद्रांक शुल्क व ग्रामीण भागात तीन टक्के मुद्रांक शुल्क आकारले जाणार असल्याचे मुद्रांक जिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, सरकारने मुद्रांक शुल्कात सवलत दिल्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत 30 नोव्हेंबरपर्यंत मालमत्ता खरेदी-विक्रीच्या दस्तसंख्येत 7076 वाढ झाली.
सरकारने मार्चअखेर जिल्ह्याला 160 कोटींचे मुद्रांक शुल्क वसुलीचे उद्दिष्ट दिले होते. पैकी आतापर्यंत 8 महिन्यांत 158 कोटी 31 लाख रुपयांची वसुली झाली आहे. पुढील 4 महिन्यांत राज्य शासनाने ठरवून दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक वसुली करण्यात यशस्वी होऊ.
- राजेंद्र पाटील, मुद्रांक जिल्हाधिकारी , अहमदनगर