
बुळे पठार (चिखलठाण) भागात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला पकडण्यासाठी वन खात्याने पिंजरा लावला आहे.
राहुरी (अहमदनगर) : बुळे पठार (चिखलठाण) भागात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला पकडण्यासाठी वन खात्याने पिंजरा लावला आहे. अंधार झाल्यावर बिबट्याच्या भीतीने परिसरात संचारबंदीसारखी परिस्थिती निर्माण होत आहे.
बुळे पठार येथे रात्री बिबट्याने दोन जणांवर हल्ला केला होता. त्यात मच्छिंद्र किसन दुधावडे (वय 35) यांच्या हाताला, तर तानाजी हरिबा केदार (वय 45) यांच्या पोटाला गंभीर जखमा झाल्या. बिबट्याशी कडवी झुंज देत दोघांनी त्याच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेतली. नशीब बलवत्तर म्हणून त्यांचे प्राण वाचले. बिबट्याच्या हल्ल्यात दोन गायी व एक वासरू जखमी झाले.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. लहान मुले, महिला, वृद्ध ग्रामस्थ दिवसाउजेडीही घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत. अंधार पडल्यानंतर तर गावात संचारबंदीसारखी स्थिती निर्माण होते. जिवाच्या भीतीने शेतीकामे करण्यास ग्रामस्थ धजावत नाहीत. बिबट्याचे वारंवार दर्शन घडत असल्याने ग्रामस्थांनी पिंजरा लावण्याची मागणी केली होती. वन खात्याने पिंजरा लावल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
संपादन : अशोक मुरुमकर