शेवगाव तहसिल कार्यालयात गोंधळ; आठ ते नऊ जणांविरुध्द गुन्हा दाखल

A case has been registered against eight to nine persons for obstructing government work at Shevgaon tehsil office.jpg
A case has been registered against eight to nine persons for obstructing government work at Shevgaon tehsil office.jpg

शेवगाव (अहमदनगर) : वैयक्तिक कारणास्तव तहसिल कार्यालयात एकमेकांशी वाद करुन गोंधळ घालणा-या व शासकीय कामकाजात अडथळा आणणा-या दोन गटातील आठ ते नऊ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नायब तहसिलदार विकास जोशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन विशाल विजयकुमार बलदवा, विजयकुमार बलदवा राहणार शेवगाव या पिता पुत्रासह इतर सात ते आठ अनोळखी इसमांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर तहसिल कार्यालयात वादावादीत करत गोंधळ घालणा-या दोन गटातील वादातून मिनाक्षी भाऊसाहेब कळकुंबे राहणार आव्हाणे खुर्द यांच्या फिर्यादीवरुन बलदवा पिता पुत्रावर जातीवाचक शिवीगाळ, छेडछाडीचा दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान तहसिल कार्यालयातील या गडबड गोंधळ व हाणामारीच्या प्रकारामुळे महसूल कर्मचा-यांनी कार्यालयाला टाळे ठोकून काम बंद करत निषेध व्यक्त केला.
 
नायब तहसिलदार जोशी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मंगळवार (ता.३०) रोजी सकाळी १२ च्या सुमारास कार्यालयातील कर्मचा-यांसह मार्च एंडचे महत्वाचे हिशोबी कामकाज करत होतो. त्यावेळी तहसिलदार दालनाच्या बाहेर गोंधळाचा व आरडाओरडयाचा आवाज आला. त्यामुळे बाहेर येवून पाहिले असता तेथे विशाल बलदवा व त्याचे वडील विजयकुमार बलदवा यांच्यात व इतर सात आठ जणांमध्ये मारामारी सुरु होती. मी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता कोणी ही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. नंतर सदर जमाव नायब तहसिलदार यांच्या दालनासमोर आल्याने त्यांच्यातील गोंधळामुळे आम्हाला शासकीय कामकाज करणे अवघड बनले.

या आवाजामुळे तहसिलदार अर्चना पागिरे - भाकड तेथे आल्या व त्यांनी तुमच्यातील वाद कार्यालयाच्या बाहेर करा येथे गोंधळ घालून शासकीय कामकाजात अडथळा आणू नका. मात्र तरीही बलदवा यांनी आरेरावीची व उध्दट भाषा वापरत तहसिलदार पागिरे यांच्याशी हुज्जत घातली. त्यामुळे कार्यालयातील वाळू लिलाव व इतर कामकाजात अडथळा आला. या कारणास्तव बलदवा पिता पुत्रासह सह सात ते आठ अनोळखी इसमाविरुध्द जमावबंदी आदेशाचे उल्लंघन, शासकीय कामकाजात अडथळा आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

तर याच प्रकरणातील मिनाक्षी कळकुंबे यांनी दिलेल्या दुस-या फिर्यादीत म्हटले आहे की, आज मुलगा संकेत याच्यासह स्वस्त धान्य दुकानाच्या कामासाठी तहसिल कार्यालयात गेले असता कार्यालयाच्या आवारातील तलाठी कार्यालयासमोरुन पुरवठा शाखेकडे जात असताना विशाल बलदवा हा एका स्कुटीजवळ उभा होता. तेथून माझ्याकडे पाहून जातीवाचक शिवीगाळ करत माझ्याशी झटापट करत लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.

तसेच गळ्यातील दीड तोळा सोन्याचे गंठण तोडले. त्यामुळे मी घाबरुन आरडा ओरड केल्याने मुलगा संकेत व इतर काही लोक तेथे आले. त्यांनी मला त्याच्या तावडीतून सो़डवले. या झटापटीत माझा मोबाईल पडून फुटला. यावेळी विशाल बलदवा याचे वडील विजयुकमार बलदवा ही तेथे होते. त्यांनीही जातीवाचक शिवीगाळ केली. त्यामुळे या दोघांविरुध्द शिवीगाळ, छेडछाडीचा गुन्हा दाखल केला आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com