दूधाचे पैसे मागितले म्हणून राष्ट्रवादीच्या नेत्याकडून जीव मारण्याचा प्रयत्न

निलेश दिवटे
Wednesday, 12 August 2020

दुधाचे पैसे मागितले या कारणावरून युवकाला गाडी अंगावर घालून मारण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार कर्जत तालुक्यात घडला आहे.

कर्जत (अहमदनगर) : दुधाचे पैसे मागितले या कारणावरून युवकाला गाडी अंगावर घालून मारण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार कर्जत तालुक्यात घडला आहे. याप्रकरणी येथील पंचायत समितीचे राष्ट्रवादी काँग्रेस नेते व माजी सभापती नानासाहेब निकत व पोलिस पुत्रावर कर्जत पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. यातील संशयित आरोपी चार दिवसापासून फरार आहेत. 

तालुक्यातील आंबिजळगांव येथील युवक शेतकरी रमन विक्रम निकत यांनी येथील पोलिसात ८ ऑगस्टला फिर्याद दिली आहे.  फिर्यादीत उल्लेख केल्यानुसार रमण निकत हे कुटुंबियांसह आंबिजळगांव येथे राहतात. त्यांच्याकडे पाच संकरीत गाई आहेत. रमण निकत हे नानासाहेब निकत यांच्या दुध डेअरीला दुध घालतात. चार पाच महिन्यांपासून दुधाचे पगार झाले नाहीत. यामुळे सुमारे दोन महिन्यांपूर्वी रमण निकत हे कर्जतला आले. कर्जत येथे नानासाहेब निकत यांचे सिद्धी पशुआहार या नावाने पशु खांद्याचे दुकान आहे. या दुकानात जाऊन रमण निकत यांनी निकत यांना दुधाच्या पगारापोटी ३० हजार रुपये मागितले. 

यावेळी नानासाहेब निकत म्हणाले, तुझे माझ्याकडे कसलेही पैसे नाहीत. यावेळी या दुकानात नानासाहेब निकत यांचा मित्र सचिन शेटे हा बसला होता. तो म्हणाला तु सभापतीला पैसे मागितले तर तुला जीवंत सोडणार नाही, असे धमकावले व मला दुकानातून हाकलून दिले.

८ ऑगस्टला मी आंबिजळगांव येथे ट्रॅक्टरवरून माझे चुलते लक्ष्मण निकत यांच्या जनावरांसाठी मका चारा घेऊन चाललो होतो. पण माझा ट्रॅक्टर पंक्चर झाला. गावातील सुरेश यादव यांच्या दुकानासमोर मी ट्रॅक्टर पंक्चर काढण्यासाठी लावला व मी लघुशंका करण्यासाठी रस्ता ओलांडत असताना पांढरा रंग असलेली गाडी सरळ माझ्या अंगावर येत आहे, हे मी पाहिले यावेळी प्रसंगावधान राखून मी रोडवरून उडी मारली. 

ही गाडी पुढे जाऊन थांबली या गाडीतून नानासाहेब निकत व सचिन शेटे उतरले. यावेळी सचिन शेटे शिवीगाळ करत म्हणाले, मी तुझ्या अंगावर गाडी घातली होती. पण तु वाचलास तुला तर ठार मारायचे होते. दोघांनी शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. हा आवाज ऐकून सुरेश यादव व अनिल निकत आले. त्यांनी माझी या दोघांच्या तावडीतून सुटका केली. मला धमकी देऊन हे दोघे शेगुडच्या दिशेने निघुन गेले. 

कर्जत पंचायत समितीचे माजी सभापती राष्ट्रवादी काँग्रेसचे नानासाहेब निकत व मुंबई येथील पोलिस अधिकारी यांचा मुलगा सचिन शेटे यांनी गावातील शांतता भंग केली आहे. यामुळे ग्रामस्थ दहशतीखाली आहेत. या दोन्ही आरोपींना त्वरीत अटक करावी, अशी मागणी आम्ही कर्जत पोलिसांकडे कली आहे. यांना अटक झाली नाही तर आंदोलन करू.
- विलास निकत, सरपंच, आंबिजळगांव ग्रामपंचायत 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A case has been registered against a NCP leader and a policeman son in Karjat taluka