कांद्यामुळे पारनेरमध्ये झाला वांदा ः झावरे म्हणाले, तहसीलदारबाई तुम्ही हप्ते खाता, मग त्यांनीही दाखवली कायद्याची भाषा

मार्तंड बुचुडे
Thursday, 17 September 2020

केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, हा निर्णय मागे घ्यावा, या मागणीचे निवेदन देण्यासाठी झावरे कार्यकर्त्यांसह आज तहसील कार्यालयात गेले होते.

पारनेर ः कांदा निर्यातबंदीबाबत निवेदन देण्याकरिता तहसील कार्यालयात कार्यकर्त्यांसह गेलेले जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे व तहसीलदार ज्योती देवरे यांची आज दालनातच शाब्दिक चकमक उडाली. त्यामुळे तहसील कार्यालयातील वातावरण तणावपूर्ण झाले होते.

"तुम्ही कोणाच्या आशीर्वादाने वाळूचे हप्ते घेता, हे मला माहिती आहे,' असा थेट आरोप झावरे यांनी देवरे यांच्यावर केला, तर महिला अधिकाऱ्याला झावरे यांनी अश्‍लील भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप देवरे यांनी केला. 

केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, हा निर्णय मागे घ्यावा, या मागणीचे निवेदन देण्यासाठी झावरे कार्यकर्त्यांसह आज तहसील कार्यालयात गेले होते.

"कोरोनामुळे सरकारी नियमाप्रमाणे व जमावबंदी आदेशाचे पालन करून पाच व्यक्तींना घेऊन आत या व निवेदन द्या,' असे तहसीलदार देवरे यांनी सांगितले. मात्र, झावरे यांनी कार्यकर्त्यांसह तहसीलदारांच्या दालनात प्रवेश केला. त्यातून वाद वाढत गेला. झावरे यांनी देवरे यांच्यावर "वाळूचे हप्ते घेता,' असा थेट आरोप केल्याने त्यांच्यात चांगलीच शाब्दिक खडाजंगी झाली. 

तहसील कार्यालयात कार्यकर्ते, विविध कामांसाठी आलेले नागरिक व अधिकारी- कर्मचाऱ्यांसमोरच हा वाद रंगला होता. त्यामुळे काही काळ तहसील कार्यालयातील वातावरण तंग झाले होते. झावरे यांच्या समवेत पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके, राहुल शिंदे, शंकर नगरे, सरपंच बाळासाहेब रेपाळे, दीपक नाईक, योगेश मते, उमेश सोनवणे आदी उपस्थित होते. 

फिर्यादीसाठी तीन तास ताटकळत 
तहसील कार्यालयातील वादानंतर तहसीलदार देवरे यांनी थेट पारनेर पोलिस ठाणे गाठले. झावरे यांच्याविरुद्ध फिर्याद देण्यासाठी त्या पोलिस ठाण्यात तीन तासांहून अधिक काळ बसून होत्या. या वेळी झावरे गटाच्या कार्यकर्त्यांनी "फिर्याद देऊ नका,' अशी विनंती केली; मात्र, तहसीलदार ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हत्या. उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A case has been registered against Sujit Jhaware in Parner