
लग्नासाठी मुलगी द्यायला नकार दिल्याने तरुणीने लढवली अशी शक्कल
श्रीगोंदे - लग्नासाठी मागणी घातल्यानंतर मुलगी द्यायला नकार दिल्याने एका महाविद्यालयीन तरुणीचे अपहरण केल्याप्रकरणी सागर सुरेश माहूरकर (रा. लिंपणगाव) व अन्य दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध श्रीगोंदे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अपहृत तरुणीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सोमवारी(ता. ८) सायंकाळी पाचच्या सुमारास महाविद्यालय सुटल्यानंतर विद्यार्थिनी जामखेड-शिक्रापूर महामार्गाने चालल्या होत्या. शहरातील महावितरण कार्यालय परिसरातून जाताना एका काळ्या रंगाच्या चारचाकीतून (एमएच १६ एटी ९३००) सागर माहूरकर व त्याचे दोन मित्र, असे तीन तरुण आले. त्या तिघांनी त्या एकवीस वर्षीय महाविद्यालयीन तरुणीला जबरदस्तीने गाडीत बसवून पळवून नेले.
दरम्यान, आरोपी सागर सुरेश माहूरकर याने अपहृत मुलीला लग्नासाठी मागणी घातली होती. मात्र, मुलगी द्यायला नकार दिल्यानेच सागर माहूरकर व त्याच्या दोन मित्रांनी अपहरण केल्याप्रकरणी श्रीगोंदे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक महेश जानकर हे करीत आहेत.