मुलाचं लग्न करताय, मग सावधान! विदर्भातील मुली-महिलांची टोळी करते बनावट विवाह

सूर्यकांत वरकड
Monday, 9 November 2020

ज्या मुलाचे लग्न जमत नाही त्याला शोधायचा आणि कसंही करून त्याला जाळ्यात अडकवायचं. असा विदर्भातील महिला, मुलींच्या टोळीचा डाव असतो.नेवाशात त्यांनी केलेला असाच एक गुन्हा उघडकीस आला आहे.

नगर : पूर्वी एखादा बदमाश मुलीला किंवा महिलेला कच्छपि लावायचा. तिच्या आई-बापाकडून पैसे उकळून पोबारा करायचा. परंतु आता काळ बदलला आहे. मुलाकडूनच हुंडा घेण्याचा रिवाज सुरू झाला आहे. त्यामुळे मुलीच मुलांना गंडा घालीत आहेत. स्त्री-पुरूष गुणोत्तरात तफावत असल्याने लग्नासाठी मुली मिळत नाहीत. परिणामी असे प्रकार वाढले आहेत.

लग्नासाठी वरपक्षाकडून भरमसाट हुंडा घ्यायचा. दोन दिवस सासरी राहिले, की सासरचा पैसाअडका, दागदागिने घेऊन नवरी गायब व्हायचे. अशा प्रकारे बनावट लग्न करून नवरदेवांना फसविणाऱ्या टोळीचा नेवासे पोलिसांनी पर्दाफाश केला.

नेवासे येथील नवरदेवाला दोन लाख रुपयांना फसविल्याच्या गुन्ह्यात नेवासे पोलिसांनी चार महिलांसह एकाला गजाआड केले. रूपाली पांडुरंग जगताप (नवरी), शारदा भागाजी तनपुरे (रा. टिटवी, ता. लोणार, जि. बुलडाणा), सागरबाई किसन डवरे (रा. लोणार, जि. बुलडाणा), मायावती नारायण चपाते व अनिल नाथा झिने (रा. जमुनानगर, जालना), अशी आरोपींची नावे आहेत. या बाबत पीडित नवरदेवाच्या फिर्यादीवरून नेवासे पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. 

नेवासे येथील तरुण लग्नासाठी मुली पाहत होता. आरोपी शारदा तनपुरे हिच्याकडे उपवर मुलगी असल्याची माहिती त्याला समजली. त्यानुसार, मुलगी पसंत झाल्यानंतर 3 नोव्हेंबर रोजी मध्यमेश्‍वर (ता. नेवासे) येथे तरुणाचे रूपाली जगतापशी लग्न झाले. त्यानंतर 6 नोव्हेंबर रोजी पोटात दुखत असल्याचे पत्नीने त्यास सांगितले.

नवरदेवाने तिला नेवासे येथील रुग्णालयात नेले. मात्र, तेथून ती गुपचूप निघून गेली. रात्रीच्या वेळी रस्त्यावर फिरत असताना, दोघांनी तिला नेवासे पोलिस ठाण्यात नेले. पोलिसांनी माहिती विचारली असता, तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी तिच्या पतीला बोलावून दोघांना घरी पाठविले. 

दरम्यान, औरंगाबाद येथील अनिल झिने याने एकाला पोलिस ठाण्यात पाठवून नवरीची चौकशी केली. त्यातून पोलिसांचा संशय बळावला आणि बनावट लग्नाचा प्रकार समोर आला.

पोलिसांनी पुन्हा रूपालीची कसून चौकशी केली तेव्हा तिने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानुसार, पोलिसांनी रूपालीसह वरील चार आरोपींना अटक केली. या प्रकरणात नवरदेवाची दोन लाखांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. 

अशी आहे फसवणुकीची पद्धत 
एखाद्या नातेवाइकाच्या माध्यमातून, लग्न न होणाऱ्या मुलाला हेरायचे. त्याच्याकडूनच दोन-तीन लाख रुपये हुंडा घेऊन लग्न करायचे. नंतर चार-पाच दिवस त्याच्या घरी राहून, अंगावरील दागिन्यांसह तेथून पळ काढायचा. कटात सामील असलेल्या प्रत्येकाला त्याचा वाटा द्यायचा. पुन्हा नवीन मुलाचा शोध घ्यायचा, अशी या टोळीची गुन्ह्याची पद्धत आहे. 
 
मुलाचे लग्न करताना नातेवाइकांनी प्रत्येक गोष्टीची खात्री करावी. लग्नाचा बनाव करून कोणाची फसवणूक झाली असल्यास नेवासे पोलिसांशी संपर्क साधावा. 
- अभिनव त्यागी, परिविक्षाधीन पोलिस अधिकारी 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Caught a gang cheating people by fake marriages