
साईदर्शनासाठी गुरुवारी रात्री निघालेले नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर व त्यांचे सहकारी आणि साईसंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांच्यात समोरासमोर वादावादी झाली.
शिर्डी (अहमदनगर) : साईदर्शनासाठी गुरुवारी रात्री निघालेले नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर व त्यांचे सहकारी आणि साईसंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांच्यात समोरासमोर वादावादी झाली.
त्यानंतर काल सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास साईसंस्थानच्या सीसीटीव्ही विभागाचे प्रमुख किशोर गवळी यांनी पोलिस ठाण्यात या वादाचे सीसीटीव्ही फुटेज दाखल केले. त्याआधारे ग्रामस्थांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी कारवाई करण्याबाबतचे पत्र दिले आहे.
पोलिस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांनी पोलिस ठाण्यात सीसीटीव्ही फुटेज दाखल केले आहे. त्याआधारे चौकशी करून कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले. साईसंस्थानचे गवळी यांनी दाखल केलेल्या अर्जानुसार, हे ग्रामस्थ गुरुवारी रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास अनाधिकाराने मंदिर परिसरात आले. त्याचे चित्रण करण्यात आले. त्यानुसार, त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी पत्रात केली आहे.
नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांच्यासोबत माजी नगराध्यक्ष अनिता जगताप, संस्थानचे माजी विश्वस्त सचिन तांबे, नगरसेवक सुजित गोंदकर आदींसह काही पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी बगाटे यांच्याकडे त्यांच्यासोबत असलेले कॅमेरे बंद करण्याचा आग्रह धरला. बगाटे हे या सर्वांना एका बाजूला उभे राहा, त्यासाठी माझ्यासोबत चला, असा आग्रह करीत होते. वादावादी झाल्यानंतर बगाटे यांनी सर्वांना साष्टांग दंडवतच घातला.
नगराध्यक्ष या नात्याने मुख्य कार्यकारी अधिकारी बगाटे यांनी मला साईदर्शनासाठी बोलाविले होते. त्यामुळे मी मंदिर परिसरात गेलो होतो. वाद घालणे आणि शिस्तभंग करणे, हा माझा स्वभाव नाही, असे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर म्हणाले.
साईदर्शनासाठी बाहेरून आलेल्या भाविकांना अडथळा नको, म्हणून मी ग्रामस्थांना बाजूला उभे राहा. तुमच्यासाठी मी दर्शनाची व्यवस्था करतो, असे वारंवार सांगत होतो. मात्र, ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांच्याबाबत मात्र आपले काहीही म्हणणे नाही.
- कान्हूराज बगाटे, मुख्य कार्यकारी अधिकारी, साईसंस्थान
संपादन : अशोक मुरुमकर