esakal | व्यापारी गौतम हिरण हत्याकांडाचे दोषापत्र दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

व्यापारी गौतम हिरण हत्याकांडाचे दोषापत्र दाखल

sakal_logo
By
गौरव साळुंके

श्रीरामपूर ः तालुक्यातील बेलापूर येथील व्यापारी गौतम झुंबरलाल हिरण हत्याकांड प्रकरणातील पाच आरोपींविरुद्ध पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी आज (गुरुवारी) येथील जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. वाकडी (ता. राहता) शिवारात ७ मार्च २०२१ रोजी हिरण यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला होता.

मिटके यांनी एकूण २५ साक्षीदारांची तपासणी करून एकूण ५०५ पानांचे अजय राजू चव्हाण (वय 26), नवनाथ धोंडू निकम (वय २३), आकाश प्रकाश खाडे (वय २२), संदीप मुरलीधर हांडे (वय २६), जुनेद ऊर्फ जावेद बाबू शेख (वय २५) यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले. (Chargesheet filed in court in Gautam Hiran death case)

हेही वाचा: नगर जिल्ह्यात सोळाशे कोटी रूपयांचे बेकायदा दगड उत्खनन

२७ फेब्रुवारी २०२१ रोजी ढग्याचा डोंगर (ता. सिन्नर) येथे आरोपींनी एकत्र येऊन हिरण यांचे अपहरण केले. तसेच त्यांची हत्या करून त्यांच्याजवळील रोख रक्कम चोरून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा कट रचल्याचे दोषारोपपत्रात नमूद केले आहे.

नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रताप दिघावकर तसेच जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन सर्व शक्यता तपासून पाहत तपास सुरू केला. तसेच घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तपासाची सूत्रे पोलिस उपअधीक्षक मिटके यांच्याकडे सोपविली होती. तपासादरम्यान, गुन्ह्यातील पाच मुख्य आरोपींना नाशिकसह सिन्नर येथून पोलिसांनी अटक केली होती. गुन्ह्यापूर्वी व गुन्हा केल्यानंतर आरोपींच्या विविध ठिकाणच्या हालचालींचे सीसीटीव्ही फुटेज तसेच गुन्ह्यासाठी वापरलेली व्हॅन, दुचाकी, छऱ्याच्या बंदूक, चाव्यांच्या जुडगा, एटीएम कार्डसह धनादेश पुस्तिका पोलिसांनी आरोपींकडून जप्त केले आहे.

अधिवेशनात उपस्थित झाला होता मुद्दा

व्यापारी गौतम हिरण यांचा मृतदेह सापडल्यानंतर व्यापाऱ्यांनी आरोपींना अटक करण्यासाठी आंदोलन केले होते. तसेच राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात याबाबत सवाल उपस्थित केला होता. त्यामुळे सदर गुन्ह्याचा तपास लक्षवेधी ठरला.(Chargesheet filed in court in Gautam Hiran death case)