esakal | दोन दरोडेखोरांना पाठलाग करून पकडले

बोलून बातमी शोधा

दरोडेखोर पकडले
दोन दरोडेखोरांना पाठलाग करून पकडले
sakal_logo
By
सुहास वैद्य

कोल्हार : नगर-मनमाड रस्त्यावर हॉटेल मेजवानीजवळ ट्रकचालकास पाच जणांच्या टोळीने लुटले. याची माहिती मिळताच लोणी पोलिसांनी पिंप्री शिवारात त्यांचा पाठलाग करून दोघांना अटक केली, तर तिघे जण पळून जाण्यात यशस्वी झाले.

आरोपींकडून पिक-अप, मोबाईल, कोयते जप्त करण्यात आले आहेत. ट्रकचालक किशोर मोतीराम दुकळे (रा. चोंडी जळगाव, मालेगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किरण भाऊसाहेब जाधव (रा. देहरे), विशाल प्रभाकर साठे (रा. ब्राह्मणी), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. किरण अर्जुन आजबे (रा. भिंगार), शाहरुख सय्यद व दीपक (दोघांची पूर्ण नावे समजली नाही, रा. नाहूर, ता. श्रीरामपूर) हे तिघे अंधाराचा फायदा घेऊन शेतात पळून गेले.

दुकळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की ते व त्यांचा साथीदार दत्तू शेरमाळे मालेगाव येथून बाजरी घेऊन ट्रकने (एमएच 18 बीजी 2797, एमएच 41 केयू 5575) कुरकुंभकडे (ता. दौंड) जात होते. (ता. 30) पहाटे दीडच्या सुमारास कोल्हारच्या हॉटेल मेजवानीजवळ ट्रकचा टायर पंक्‍चर झाला. दोन्ही ट्रक रस्त्याच्या कडेला घेऊन चाक बदलत होतो. त्यावेळी पाच अनोळखी व्यक्तींनी आमच्यावर कोयत्याने वार केले, तसेच रोख रक्कम व मोबाईल चोरून नेले.

घटनेची माहिती मिळताच लोणी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक समाधान पाटील, पोलिस उपनिरीक्षक नानासाहेब सूर्यवंशी, पोलिस कॉन्स्टेबल सूर्यभान पवार, संपत जायभाये यांच्या पथकाने त्यांचा पाठलाग केला. पिंप्री शिवारात दोघांना अटक केली. लोणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.