स्वस्त धान्याची वाहतूकही एसटीद्वारे करावी

शांताराम काळे
Friday, 4 December 2020

खासगी वाहतुकीला फाटा देत अलीकडे एसटी महामंडळाच्या मालवाहतूक बसमधून माल नेण्या- आणण्यास व्यापारी, शेतकरी प्राधान्य देत आहेत.

अकोले (अहमदनगर) : खासगी वाहतुकीला फाटा देत अलीकडे एसटी महामंडळाच्या मालवाहतूक बसमधून माल नेण्या- आणण्यास व्यापारी, शेतकरी प्राधान्य देत आहेत. अकोले येथील ग्राहक पंचायतीचे मच्छिंद्र मंडलिक यांनी, तालुक्‍यासाठीच्या स्वस्त धान्याची (रेशन) वाहतूक या बसमधून करावी, म्हणजे भ्रष्टाचार होणार नाही व चोरीवरही बंधने येतील, असे मत व्यक्त केले. 

नगर येथून राजूर शहरात दहा टन पेंड घेऊन हिरामण कवडे यांच्या दारात मालवाहतूक बस येताच ग्रामस्थांनी गर्दी केली होती. त्या वेळी मंडलिक यांनी वरील मत व्यक्त केले. तारकपूर (नगर) आगाराचे चालक बिभीषण गणपत गाडेकर यांनी ही बस आणली. "नगरला आपला मका न्यायचा आहे,' असे म्हणत काही व्यापाऱ्यांनी या वेळी संबंधित विभागाशी संपर्कही केला. 

गावागावांत माणसांची वाहतूक करताना विविध प्रकारचे साहित्य, धान्य, सिमेंट, शेतीमालाचीही वाहतूक होत असल्याने, अनेकांनी या बस व्यवस्थेला प्राधान्य दिले आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cheap foodgrains should also be transported through ST bus