मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाणार राळेगणसिद्धीत, अण्णांनीच दिली माहिती

मार्तंड बुचुडे
Friday, 13 November 2020

मी मुख्यमंत्र्यांसह सरकारमधील 22 मंत्र्यांना व नेत्यांना राज्यात लोकायुक्त कायदा करावा म्हणून पत्र पाठविली होती. फक्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच पत्राला उत्तर दिले.

पारनेर ः ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे देशासाठी मोठे योगदान आहे. त्यांच्या आंदोलनांनी अनेक मंत्र्यांना घरी बसावे लागले. काहीजणांना तुरूंगाची हवा खावी लागली. यात शिवसेनेच्या मंत्र्यांचाही समावेश होता.परंतु अण्णांच्या आंदोलनाविषयी अनेकांचे मतभेद होते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही अण्णांवर जहीर भाषेत टीका केली होती. मात्र, याला आता बरीच वर्षे उलटली आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अण्णांच्या आंदोलनांचा आदर करीत आले आहेत. त्यांची राळेगणला जाण्याचीही इच्छा व्यक्त केली आहे. 

मी मुख्यमंत्र्यांसह सरकारमधील 22 मंत्र्यांना व नेत्यांना राज्यात लोकायुक्त कायदा करावा म्हणून पत्र पाठविली होती. फक्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच पत्राला उत्तर दिले. इतकेच नव्हे तर कोरोना कहर संपल्यानंतर त्यावर गांभिर्याने विचार करू. तुमच्यासह एकत्रित बैठक घेऊ. मला तुमचे राळेगणसिद्धी गाव पाहावयाचे आहे. त्यामुळे कोराना संपल्यानंतर सवडीने मी तुमच्या भेटीस येईल. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीच मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या संभाषणाची माहिती दिली. 

देशात लोकपाल कायदा मंजूर झाला आहे. त्याचप्रमाणे राज्यात लोकायुक्त कायदा झाला तर देशातील व राज्यातील 85 टक्के भ्रष्टाचार कमी होणार आहे. मात्र, या कायद्यामुळे अनेक अधिकारी व राजकिय नेते मंडळींचा भ्रष्टाचाराचा मार्ग बंद होणार आहे. या सर्वानाच हा कायदा नको आहे. असेही हजारे यांनी सांगितले. दोशात लोकपाल येण्यासाठी 45 वर्ष लागली. आठ वेळा तो संसदेत मांडावा लागला. अनेक वेळा आंदोलने करावी लागली ,तेव्हा तो पास झाला. आता राज्यात लोकायुक्त कायदा येण्यासाठी किती दिवस लागतील, हे सांगता येत नाही.

आता मुख्यमंत्री ठाकरे यांनी कोरोना संपल्यावर लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे. लोकायुक्ताचा कच्चा मसुदा तयार झाला आहे. तो अतिशय चांगला आहे. या कायद्यान्वये मुख्यमंत्र्यांविषयी एखाद्याने तक्रार केली तर त्यांचीही चौकशी करण्याचे अधिकार लोकायुक्तास असणार आहेत. लोकायुक्त हा स्वतंत्र व सार्वभौम असणार आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराच मोठ्या प्रमाणात आळा बसणार आहे.

जर कच्या मसुदा तयार आहे, त्या प्रमाणे राज्यात कायदा झाला तर तो देशातील आदर्श असा कायदा ठरणार आहे. तसेच तो देशातील इतर राज्यांना दिशा देणारा कायदा ठरेल.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी लोकायुक्त कायदा करण्याविषयी अनुकुलता दाखविली आहे.

सध्या कोरोना संकटामुळे त्यासाठी बैठक बोलावणे शक्य नाही त्यामुळे कोरोना कमी झाल्यावर त्यासाठी स्वतंत्र बैठक घेऊन त्यावर चांगली चर्चा व त्याचा आभ्यास करून त्या विषय निर्णय घेऊ असे सांगितल्याचे ही हजारे म्हणाले. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chief Minister Uddhav Thackeray will go to Ralegan Siddhi