Diwali Festival 2020 : ऑनलाईनच्या अभ्यासात गुंतलेले चिमुकल्यांचे हात दिवाळी सुट्टीत किल्ले बनवण्यात गुंतले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Children are busy building forts for Diwali

किल्ला बनविण्यासाठी बालचमू टाकाऊ वस्तूंचा वापर करताना दिसत आहेत. माती, दगड, थर्मोकोल, कागदाचा पुठ्ठा, टोपली, जुन्या बादल्या तसेच घरातील जुन्या वस्तूंचा वापर करताना दिसत आहे.

Diwali Festival 2020 : ऑनलाईनच्या अभ्यासात गुंतलेले चिमुकल्यांचे हात दिवाळी सुट्टीत किल्ले बनवण्यात गुंतले

sakal_logo
By
एकनाथ भालेकर

राळेगणसिद्धी (अहमदनगर) : कोरोना संसर्गजन्य साथीमुळे घरात व ऑनलाईनच्या अभ्यासात गुंतलेल्या चिमुकल्यांना नुकतीच दिवाळीची सुट्टी मिळाली आहे. या सुट्टीत मोबाईलला सोडून आता चिमकल्यांचे हात किल्ले बनविण्यात गुंतविलेले आहेत. तसेच विविध खेळ खेळण्यात मुले रममाण झाल्याचे चित्र राळेगणसिद्धी परिसरात पहायला मिळत आहे.

कोणी किल्ल्यासाठी दगड गोळा करताना तर कुणी माती तर कुणी माती कालवताना पहायला मिळत आहे. लहान मुले विविध क्लुप्त्या लढवत किल्ला बनविण्याची मोहीम फत्ते करताना दिसत आहे. सध्या सर्वच बालचमू किल्ला बनविण्यासाठी साहित्य कसे गोळा करायचे, किल्ला कुठे बनवायचा, मावळे कसे गोळा करायचे याबाबतची व्यूहरचना आखण्यात रममाण झाले आहेत.

किल्ला बनविण्यासाठी बालचमू टाकाऊ वस्तूंचा वापर करताना दिसत आहेत. माती, दगड, थर्मोकोल, कागदाचा पुठ्ठा, टोपली, जुन्या बादल्या तसेच घरातील जुन्या वस्तूंचा वापर करताना दिसत आहे. जुने टाकावू साहित्य जमा करून पोते अंथरूण त्यावर माती सारवून किल्ला करताना दिसत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे आसन, तट, बुरुज, दरवाजे, सुळके, पाण्याची टाकी, मंदिरे, शेती, आकर्षक रंगकाम अशी विविध सजावट करीत आहेत. रायगड, राजगड, पुरंदर, प्रतापगड, जंजिरा, सिंधुदुर्ग अशा अनेक किल्ल्यांचा अभ्यास युट्यूबच्या साह्ययाने करत, त्याप्रमाणे किल्ला बनविण्याचा प्रयत्न आहेत.

आम्ही दगड मातीचेच किल्ले बनवितो. किल्ल्यासाठी लागणारे मावळे, तोफा, हत्ती, घोडे, शिवाजी महाराजांची छोटी मुर्ती मात्र आम्ही विकत आणतो. सध्या बाजारात तयार केलेले किल्ले विकत मिळत असले तरी स्वतः किल्ला बनविण्याचा आनंद काही वेगळाच असल्याची प्रतिक्रिया सुधांशु भोसले, यश गावडे, शौनक भालेकर, मनस्वी गावडे, आराध्या गावडे यांनी सकाळशी बोलताना व्यक्त केली.

प्राथमिक शिक्षक गणेश भोसले म्हणाले, किल्ले बनविणे हे जरी पारंपरिक असले तरी त्यामध्येही वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवत त्याला आधुनिक आणि आकर्षक रूप देण्याचा प्रयत्न लहान मुलांकडून होत आहे. त्यातून सर्जनशीलता वाढते तसेच छत्रपती शिवरायांचा प्रेरणादायी इतिहास कृतीतून शिकण्याची संधी मुलांना मिळते.  

संपादन - सुस्मिता वडतिले 

loading image
go to top