मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरच ठरणार ख्रिसमस कार्यक्रमाची रूपरेषा

अमित आवारी
Sunday, 20 December 2020

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लॉकडाउन संदर्भात कोणता निर्णय घेतात यावर शहरातील चर्च उद्या (सोमवार) नाताळ उत्सवाच्या कार्यक्रमांची रुपरेषा जाहीर करणार आहेत. 

नगर ः नगर शहर हे महाराष्ट्रातील जेरूसलेम समजले जाते. येथे सुमारे 15 मोठे चर्च आहेत. नाताळ सण येथे मोठ्या प्रमाणात साजरा होतो. मात्र, यंदा लॉकडाउनच्या नियमांमुळे नाताळ सणाच्या उत्साहावर परिणाम होण्याची शक्‍यता आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लॉकडाउन संदर्भात कोणता निर्णय घेतात यावर शहरातील चर्च उद्या (सोमवार) नाताळ उत्सवाच्या कार्यक्रमांची रुपरेषा जाहीर करणार आहेत. 

नाताळ सणाच्या तयारीची सुरवात नाताळाच्या अगोदर येणाऱ्या रविवारी निश्‍चित होते. या रविवारला शुभ्र देणगी रविवार (व्हाईट गिफ्ट संडे) असे म्हणतात. आज चर्च मधील प्रार्थनेला उपस्थित नागरिकांनी आपले वार्षिक संकल्प पूर्ण झाल्याबद्दल देणगी जाहीर केली. या देणगीतून गरिबांना नाताळात मदत करण्यात येते. 

राज्य शासन व जिल्हा प्रशासनाने कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता लक्षात घेता प्रार्थना स्थळात नागरिक जमण्यावर मर्यादा आणली आहे. नाताळ सणाची सुरवात मिडनाईट सर्व्हिसने (24 डिसेंबर) होते.

हा कार्यक्रम मध्यरात्री असल्याने तो होणार अथवा नाही याबाबत मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर चित्र स्पष्ट होईल. नाताळातील कार्यक्रमांची रुपरेषा तयार नसली तरी चर्च सजविण्यात आले आहेत. चर्चच्या आतमध्ये पताकांची सुंदर सजावट केली आहे. तर बाहेर विद्युत रोषणाई केली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Christmas program will be held only after the order of the Chief Minister