नगरमध्ये ५० टक्के आसनक्षमतेसह चित्रपटगृहे, नाट्यगृहे सुरु 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 6 November 2020

राज्य सरकारने चित्रपटगृहे, नाट्यगृहे, तसेच इन्डोअर गेमच्या सरावास परवानगी दिली.

अहमदनगर : राज्य सरकारने चित्रपटगृहे, नाट्यगृहे, तसेच इन्डोअर गेमच्या सरावास परवानगी दिली. त्यानुसार, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी जिल्ह्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे 50 टक्‍के आसनक्षमतेसह खुली केली. याचबरोबर जलतरण तलावासह सर्व इन्डोअर गेमच्या सरावासाठी परवानगी दिली आहे. मात्र, तेथे कोरोनाप्रतिबंधक नियमांचे पालन करावे लागणार आहे. 

जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्या आदेशानुसार, कंटेन्मेंट झोनबाहेरील जलतरण तलावांचा वापर राज्य, राष्ट्रीय, तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या सरावासाठी आजपासून सुरू करता येईल. कंटेन्मेंट झोनबाहेरील योग केंद्रांना यासंदर्भात क्रीडा व युवक सेवा संचालनालयाची परवानगी घ्यावी लागणार आहे. बॅडमिंटन, टेनिस, स्क्‍वॅश, इन्डोअर शूटिंग रेंज आदी खेळांत शारीरिक अंतर ठेवणे व सॅनिटायझेशन करण्यास सांगून परवानगी दिली आहे. 

जिल्ह्यातील चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्‍स, नाट्यगृहांना 50 टक्‍के आसनक्षमतेसह सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, तेथे खाद्यपदार्थ विकता येणार नाहीत. जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशावर कलावंतांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. खेळाडूंमध्ये मात्र उत्साहाचे वातावरण आहे. 

ज्येष्ठ रंगकर्मी पी. डी. कुलकर्णी म्हणाले, चित्रपटगृहे व नाट्यगृहे 50 टक्‍के आसनक्षमतेसह खुली करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मराठी रंगभूमी दिनाच्या दिवशी या निर्णयातून रंगकर्मींची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. मुळात कुठल्याही जिवंत कलाकृतीसाठी प्रेक्षक महत्त्वाचा आहे. एक तर पूर्ण परवानगी द्या, अथवा देऊच नका. दिवाळीनंतर चित्रपटगृहे व नाट्यगृहे खुली केली असती, तरी चालले असते. मी सरकारच्या निर्णयाचा निषेध करतो. 

बजरंग दलचे जिल्हाध्यक्ष गौतम कराळे म्हणाले, राज्य सरकारविरोधात हिंदूंच्या भावना तीव्र आहेत. 90 टक्‍के मंदिरे दानपेटीवर चालतात. चित्रपटगृहे, नाट्यगृहे, जलतरण तलाव, बागा, बाजारपेठा, आठवडे बाजार आदी गर्दीची ठिकाणे खुली केली. मात्र, मंदिरे खुली केलेली नाहीत. राज्य सरकारने लवकर मंदिरे खुली न केल्यास बजरंग दलातर्फे राज्यभर मंदिरांचे कुलूप तोड आंदोलन करण्यात येईल. 

टेबल टेनिस राष्ट्रीय खेळाडू किरण पवार म्हणाले, गेली साडेआठ महिन्यांपासून सराव बंद होता. आजच्या निर्णयामुळे खेळाडूंत उत्साह आहे. इनडोअर गेममध्ये सोशल डिस्टन्स असतो, तरी खेळाडूंनी राज्य सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cinemas and theaters with 50 percent seating capacity started in the town