मुळा नदीकाठावर नर-मादी बिबट्याची फिरतीय जोडी; नागरिकांची रात्रीची उडाली झोप

विलास कुलकर्णी
Friday, 9 October 2020

वळण येथे मुळा नदी पात्रात पाणी आहे. आसपास ऊसाचे मोठे क्षेत्र आहे. बिबट्यांना लपण्यास भरपूर जागा आहे. त्यामुळे, या भागात बिबट्यांनी ठाण मांडले आहे.

राहुरी (नगर) : वळण येथे मुळा नदीकाठावर नर-मादी बिबट्याची जोडी दोन बछड्यांसह फिरत आहे. बिबट्याच्या या कुटुंब काफिल्याने मागील चार दिवसांपासून परिसरात दहशत निर्माण केली आहे. त्यांनी चार कुत्रे व एका वासराचा फडशा पाडला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांची रात्रीची झोप उडाली आहे. काल (गुरुवारी) रात्री वनखात्याने उपलब्ध करून दिलेला पिंजरा लावण्यात आला आहे.
     
आज (गुरुवारी) पहाटे साडेपाच वाजता त्यांनी विजय आढाव यांच्या वस्तीवरील पाळीव कुत्र्यावर हल्ला चढविला. वस्तीवरील नागरिक जागे झाल्याने तेथील कुत्रे वाचले. वळण येथे राजदेव वस्ती, डमाळे वस्ती व विटभट्टी परिसरात बिबट्यांनी पाळीव प्राण्यांवर हल्ले चढविले. शिवनाथ डमाळे यांच्या गोठ्यातील वासरू बिबट्यांनी ठार केले. मागील चार दिवसात परिसरातील चार कुत्रे बिबट्यांनी फस्त केले. ऋषिकेश आढाव, रमेश आढाव, बाबुराव डमाळे, भागवत डमाळे, अनिल राजदेव, गणेश राजदेव, बाळासाहेब देशमुख, कुर्बान शेख, इसाक शेख यांना बिबट्यांच्या कुटुंब काफिल्याने दर्शन घडविले. काहींनी नर-मादी व एक बछडा; तर, काहींनी मादी व दोन बछडे पाहिले. 
       
वळण येथे मुळा नदी पात्रात पाणी आहे. आसपास ऊसाचे मोठे क्षेत्र आहे. बिबट्यांना लपण्यास भरपूर जागा आहे. त्यामुळे, या भागात बिबट्यांनी ठाण मांडले आहे. नागरिकांनी बंद पडलेले पथदिवे सुरू केले आहेत. रात्रीच्या वेळी घरांच्या व गोठयांच्या जवळ पुरेसा उजेड राहण्यासाठी व्यवस्था केली आहे.  दिवसाउजेडी शेतात जाण्यास ग्रामस्थ घाबरत आहेत. वनखात्याचे कर्मचारी लक्ष्मण किनकर यांनी तत्काळ एक पिंजरा उपलब्ध करून दिला. काल रात्री राजदेव वस्ती येथे पिंजरा बसविण्यात आला.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Citizens are scared as a pair of male and female leopards are roaming on the banks of Mula river