शेवगाव : दुहेरी हत्याकांडाने शहर हादरले

सचिन सातपुते
Sunday, 24 January 2021

अत्यंत निर्घृण पध्दतीने घडलेल्या या खुनाच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

शेवगाव (अहमदनगर) : शहरातील पाथर्डी रस्त्यावरील औदयोगिक प्रशिक्षण संस्थेच्या शेजारील मोकळया जागेत एका महिलेचा व मुलाचा मृतदेह आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे अंदाजे ५५ ते ६० वर्ष वयाच्या महिलेच्या मृतदेहाचे शीर गायब असून ११ ते १५ वयाच्या मुलाच्या डोक्यावर मार लागल्याच्या खुणा असून शेजारी विटाचे तुकडे आढळून आले आहेत. अत्यंत निर्घृण पध्दतीने घडलेल्या या खुनाच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. महिलेच्या मृतदेहाचे केवळ धड असल्याने व त्यावरील शीर गायब असल्याने सदर दोन्ही मृतदेहाची ओळख पटलेली नाही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
  
याबाबत समजलेली माहिती अशी की, शेवगाव शहरानजीकच्या औदयोगिक प्रशिक्षण संस्थेच्या दक्षिणेकडील बाजूस पाथर्डी रस्त्याला लागून असलेल्या मोकळया जागेत काही नागरीकांस रविवार (ता.२४) रोजी दुपारी १२ च्या सुमारास एका महिलेचा मृतदेह आढळून आला. त्यांनी याबाबतची माहिती पोलिस ठाण्यात दिली. त्यानंतर तात्काळ सहाय्यक पोलिस निरीक्षक सुजीत ठाकरे, पोलिस उपनिरीक्षक विश्वास पावरा, पो.ना. सुधाकर दराडे, भाऊसाहेब गिरी, पो.ना. रविद्र शेळके, बप्पासाहेब धाकतोडे, अच्युत चव्हाण, लक्ष्मण पवार, अल्ताफ शेख यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी तेथील मोकळ्या जागेत एका ५५ ते ६० वयाच्या महिलेचा शीर नसलेला मृतदेह आढळून आला. तर काही अंतरावरील झुडपात एका १० ते १५ वयोगटाच्या मुलाचा मृतदेह आढळून आला. मुलाच्या डोक्यावर मार लागल्याच्या खुणा आढळून आल्या असून त्या शेजारीच विटाचे तुकडे पडलेले होते. महिलेच्या मृतदेहाशेजारीच उघडयावर संसारपयोगी साहित्य, लोखंडी पेटी व सरपणासाठी गोळा केलेल्या काडयाकुडया पडल्या होत्या.

मात्र दोन्ही मृतदेहाची ओळख पटलेली नसल्याने पोलिसांनी उत्तरीय तपासणीसाठी ते हलवण्यात आले. दरम्यान या घटनेची माहिती शहरात वा-यासारखी पसरताच तेथे नागरिकांनी मोठी गर्दी केली. शहरात औदयोगिक प्रशिक्षण संस्थेच्या समोरील पटांगणात दीड वर्षापूर्वी एका व्यावसायिकाचा निर्घृण खून करण्यात आला होता. त्यापूर्वी ही शहरातील विदयानगर भागात घडलेल्या तिहेरी तर आखेगाव रस्त्यावर घडलेल्या दुहेरी हत्याकांडाने खळबळ उडाली होती. आता पुन्हा महिला व बालकाचा दुहेरी हत्याकांडाने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. गेल्या काही दिवसापासून शहरात व परिसरातील मोकळया जागेत परप्रांतिय व अनोळखी लोक बेकायदा वस्ती करुन राहत असल्याने वारंवार कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. तसेच चोरीच्या व मारहाणीच्या घटना नियमितपणे घडत असतात. तालुक्यात काही दिवसापासून चोरटयांनी धुमाकूळ घातला असून पोलिसांना त्याचा तपास अदयाप लागलेला नाही. त्यातच या घटनेमुळे पोलिसांसमोरचे आव्हान वाढले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The city has been shaken by the double murder at Shevgaon